देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंत आजोबा (वय ८४ वर्षे) यांनी वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी देहत्याग केला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले, आपल्या कृपेने माझ्या वयाच्या ८४ व्या वर्षी लिहिण्याची बुद्धी आपणच मला देत आहात. यापूर्वी अशा प्रकारचे कुठलेच लिखाण न केल्यामुळे मला फारसे काही सुचत नाही, तरीही आपण माझ्याकडून हे लिहून घेत आहात. ‘आपल्याला अपेक्षित असे लिखाण आपणच माझ्याकडून करवून घ्या’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो.

(भाग १)

१. निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवलेले आनंदी बालपण !

माझा जन्म ५.३.१९३७ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या गावी आमच्या रहात्या घरीच झाला. गावाकडची घरे पुष्कळ मोठी असायची. चारही बाजूंनी चिरे असलेल्या भिंती आणि शेणाने सारवलेली भूमी असलेल्या खोल्या होत्या. घराभोवताली ५० – ६० चौरस फुटांपर्यंतच्या जागेमध्ये आंबा, फणस, नारळ आणि विविध फुले यांची झाडे होती. परसात गोठा आणि विहीर होती. माझे वडील आणि त्यांचे मोठे भाऊ नोकरीनिमित्त मुंबई येथे रहात होते. एकत्र कुटुंब असल्यामुळे माझे काका, आत्या, मी, आई आणि आजी असे आम्ही एकूण ९ जण गावी रहायचो. त्या वेळी घराच्या शेजारीच ५ – ६ एकर शेतजमीन होती. आत्याच्या जन्मानंतर १२ वर्षांनी माझा जन्म झाला. मी घरातील पहिलाच नातू असल्यामुळे घरी माझे सर्वातोपरी लाड केले जायचे. मी घरात सर्वांचा लाडका होतो.

१ अ. सात्त्विक कुटुंबामध्ये जन्म होणे : माझे आई-वडील, आजी, काका आणि आत्या या सर्वांना देवाची भक्ती करायला आवडायचे. सर्व जण एकत्र मिळून शेतीची कामे करायचे. एकत्र कुटुंबपद्धतीनुसार ९ जण एकत्र रहात असले, तरी ते आनंदी आणि समाधानी होते. ‘सर्व सोयींनी युक्त असलेल्या अशा एकत्र कुटुंबात माझे बालपण केव्हा संपले ?’, हे माझे मला कळलेच नाही. अशा सात्त्विक कुटुंबात माझा जन्म झाल्यामुळे ‘बालपणापासूनच परात्पर गुरुदेवांची माझ्यावर कृपा होती’, असे मला वाटते.

१ आ. घरी पुष्कळ देवधर्म केला जाणे : घरातील देवघरामध्ये बाळकृष्ण, श्रीराम, श्री मारुति, श्री आदिनारायण (कुलदैवत) यांच्या छोट्या छोट्या मूर्ती ठेवल्या होत्या आणि काही सुपार्‍या होत्या. (त्या माध्यमातून घरात गार्‍हाणे घातले जाई.) आत्या प्रतिदिन देवपूजेसाठी परडी भरून जास्वंद, लाल चाफा, पांढरा चाफा, पिवळी फुले, शेवंती, अनंत आणि अबोली यांची फुले काढून आणायची. अधूनमधून देवाला काही ‘सांगणे’ (काही अडीअडचण आली, तर देवाला साकडे घातले जाणे.) करायचे असल्यास त्या वेळी भटजी यायचे. घरात लग्न, मौजीबंधन इत्यादींसारख्या शुभकार्यापूर्वी भटजीबुवा येऊन देवाला ‘सांगणे’ करायचे.

१ आ १. गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी देवाला साकडे घातले जाणे आणि लोकांच्या भोळ्या भावामुळे देवही त्यांना साहाय्य करत असणे : मी लहान असतांना माझ्या शरिरावर लादडं (लालसर गांधी) उमटायचे. त्या गांधी पूर्णपणे नाहीशा होण्यासाठी देवाला साकडे घातले जायचे. ‘मला बाहेरच्यांची दृष्ट लागली आहे’, असा घरातील लोकांचा समज होता. गावात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वकाही देवाला सांगून साकडे घातले जायचे. ‘लोकांच्या भोळ्या भावामुळे देवही त्यांचे ऐकत असे’, असे मला वाटते.

१ इ. शालेय जीवन

१ इ १. वयाच्या ४ – ५ वर्षांपर्यंत आईने घरातच शिकवणे, काकांना शिक्षणाची आवड नसल्यामुळे त्यांनी शेतीची कामे शिकवणे आणि वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईला नेणे : माझ्या वयाच्या ४ – ५ वर्षांपर्यंत आई मला घरातच शिकवायची. ती माझ्याकडून पाढे म्हणून घ्यायची. त्याच समवेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्रीकृष्ण, श्रीराम, भरत, मारुतिराय आणि पांडव यांच्या गोष्टी सांगायची. माझे काका आणि आत्या यांना शिक्षणाची विशेष आवड नव्हती. काका मला शेतीची कामे शिकवायचे. ‘मी शेतकरी व्हावे’, असे काकांना मनापासून वाटायचे. ते मला सांगायचे, ‘‘लिणं आणि भिकार जिणं । (लिहिणे, म्हणजे भिकार जगणे) इरीइरी करी, तो पोट भरी । (म्हणजे जो शेती करी, तो पोट भरी)’’ अधूनमधून कधीतरी वडील मला मुंबईला घेऊन जायचे. मी ७ – ८ वर्षांचा असतांना ‘पुढील शिक्षणासाठी याला मुंबईला आणले पाहिजे, नाहीतर हा येथे गावीच राहिला, तर शेतकरी होणार’, हे माझ्या वडिलांनी ओळखले. त्याप्रमाणे त्यांनी मुंबईला जायचा दिवस ठरवून देवघरात देवाला ‘सांगणे’ केले. तेव्हा मला ‘गावाहून मुंबईला जाऊ नये. येथे गावीच आजी आणि आत्या यांच्या समवेत रहावे’, असे पुष्कळ वाटत होते.

१ इ २. वडिलांनी मुंबईला ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत नाव घालणे आणि शिक्षिका प्रेमळ असल्याने शाळा आवडू लागणे : मी मुंबईला आल्यावर वडिलांनी आपल्या मित्रांशी बोलणे करून त्या वेळची चांगली शाळा ‘बालमोहन विद्यामंदिर’, शिवाजीपार्क येथे माझे नाव घालायचे ठरवले. त्या वेळेचे मुख्याध्यापक श्री. शिवराम दत्तात्रेय रेगे (रेगेदादा) यांनी मला त्या वेळच्या दुसरीमध्ये प्रवेश दिला. गावच्या शाळेच्या मानाने मुंबईतील शाळा माझ्यासाठी निराळीच होती. सकाळी वेळेत शाळा भरायची. ‘कुसुमताई’ नावाच्या शिक्षिका आमच्या वर्गाला शिकवायला होत्या. मुले टापटीपपणे शाळेत उपस्थित रहात होती. एका वर्गात ३० ते ४० मुले असायची. वर्ग भरलेला असे. बसण्यासाठी बाके (डेस्क) होती. हे सर्व मला नवीनच होते. हळूहळू मला शाळा आवडू लागली. शाळेत शिकवलेले मला समजू लागले. त्याचे सर्व श्रेय शिक्षिका कुसुमताई यांना जाते. त्या पुष्कळ प्रेमळ होत्या. कुसुमताई अतिशय शांत, हळू आवाजात आणि प्रेमाने शिकवत असत.

१ इ ३. कठीण परिस्थितीमध्ये योग्य दिशा मिळण्यासाठी संस्मरणीय ठरलेला परुळेकरगुरुजींच्या भेटीचा प्रसंग ! : एकदा माझ्या वडिलांनी माझी ओळख बालमोहन विद्यामंदिर शाळेतील समादेशक (सल्लागार) श्री. परुळेकरगुरुजी यांच्याशी करून दिली. माझे वडील मला म्हणाले, ‘‘यांनी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत दिवसभर कष्ट आणि रात्रीच्या वेळी मार्गावरील दिव्याच्या खांबाखाली बसून अभ्यास केला आहे.’’ परुळेकरगुरुजी मला म्हणाले, ‘‘जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून परिश्रम करून वर येतो, तेव्हा त्याचा आनंद काही निराळाच असतो आणि तो नेहमीच आपल्या समवेत रहातो.’’ (परुळेकरगुरुजींच्या भेटीचा हा प्रसंग सांगतांना पू. सामंतआजोबांचा भाव जागृत झाला होता. – संकलक)

१ इ ४. वडिलांची बढती झाल्यामुळे भायखळा येथे रहाण्यास जाणे आणि तेथील ‘ह्यूम हायस्कूल’ या शाळेत प्रवेश घेण्याचे ठरणे : बालमोहन विद्यामंदिर शाळेमध्ये माझी काही वर्षे चांगली गेली. माझे शालेय शिक्षण चालू असतांना ‘वडिलांना बढती मिळाली असून ते आता ‘सबइन्स्पेक्टर’ झाले आहेत. आता आम्हाला येथून भायखळा येथे रहायला जायचे आहे’, असे समजले. भायखळा येथे ४ – ५ खोल्या असलेले आमचे घर पोलीस ठाण्याच्या जवळ होते. भायखळा येथून बालमोहन विद्यामंदिर येथे जाणे मला जड जात होते. मी एकट्याने भायखळा येथून शिवाजीपार्क येथे जाणे शक्यच नव्हते. आमच्या घरापासून १५ – २० मिनिटे चालत गेल्यावर जवळच ‘ह्यूम हायस्कूल’ होते. तेव्हा ‘बालमोहन विद्यामंदिरऐवजी भायखळा येथील ‘ह्यूम हायस्कूल’(Hume High School)मध्ये शाळेत प्रवेश घ्यावा’, असे ठरले.

१ इ ५. ‘ह्यूम हायस्कूल’मध्ये येणार्‍या अडचणींमुळे २ – ३ मास शाळेत न जाणे, वडिलांना ते समजल्यावर त्यांनी त्याविषयी विचारणे, त्यावर ‘मला बालमोहन विद्यामंदिर शाळेमध्येच शिकायचे आहे’, असे सांगणे आणि त्यानंतर पुन्हा बालमोहन विद्यामंदिर येथे प्रवेश घेणे : ह्यूम हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा होती. तेथे शिकवणारे शिक्षक लांबलचक झगा घातलेले ख्रिस्ती ‘फादर’ होते. त्यांची इंग्रजी शब्दांचे उच्चार करण्याची पद्धत निराळी होती. त्यामुळे शाळेत जे काही शिकवले जायचे, त्याचे मला नीट आकलन व्हायचे नाही. तेथे बर्‍याचदा इंग्रजी बोलावे लागत होते. शाळेत येणार्‍या अडचणींमुळे मला ‘शाळेत जाऊ नये’, असेच वाटायला लागले. त्यामुळे काही कालावधीनंतर मी २ – ३ मास शाळेत गेलोच नाही. मी घरातून शाळेत जाण्यासाठी बाहेर पडायचो; परंतु शाळेत न जाता बाहेरच कुठे तरी हिंडायचो आणि शाळा सुटण्याच्या वेळी वेळेवर घरी यायचो. काही मासांनी ही परिस्थिती माझ्या वडिलांना समजली. तेव्हा त्यांनी मला त्याविषयी विचारले. मी म्हणालो, ‘‘मला शिकण्यासाठी बालमोहन विद्यामंदिर शाळेमध्ये जायचे आहे, नाहीतर मला शिकायचेच नाही.’’ वडिलांनी ‘ह्यूम हायस्कूल’च्या ‘फादर’ना विनंती करून तेथून माझे नाव काढले. नंतर ते मला बालमोहन विद्यामंदिर शाळेमध्ये घेऊन गेले आणि तेथे इयत्ता १० वीमध्ये (एस्.एस्.सी.मध्ये) प्रवेश घेतला.

१ इ ६. वडिलांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेवानिवृत्ती घेणे, त्यामुळे भायखळा येथील जागा सोडून कळवा येथे लहान जागेत रहायला येणे आणि त्या वेळी शिक्षण घेतांना पुष्कळ कष्ट घ्यावे लागूनही दहावीत शाळेमध्ये पाचवा क्रमांक येणे : त्याच सुमारास वडिलांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सेवानिवृत्ती घेतली. त्यामुळे आम्हाला भायखळा येथील जागा सोडावी लागली. आम्ही त्या मोठ्या जागेतून कळवा येथे एकदम लहान जागेत रहायला गेलो. भायखळा येथे घरकामाला २ गृहकृत्य साहाय्यक होते. कळवा येथे सर्व कामे मी आणि आई करायचो. तेथे आम्ही थोडेच दिवस राहिलो. नंतर ठाणे आगगाडी स्थानकाजवळ चेंदनी कोळीवाड्यात भाड्याने जागा घेतली. मी पहाटे ५ वाजता उठून ठाणे आगगाडी स्थानकावरून हंडाभर प्यायचे पाणी भरून आणत होतो. नंतर आईला घरातील कामात, म्हणजे कणीक मळून देणे, ३० – ३५ पोळ्या लाटणे, भांडी घासणे, घरातील केर काढणे इत्यादींमध्ये साहाय्य करायचो. त्यानंतर शाळेत जायची सिद्धता करायचो. शाळेत दिवसभर १० वीचा अभ्यास, शिकवण्या आणि घरी परतल्यावर घरकाम असल्याने माझी पुष्कळ ओढाताण होत होती. ‘त्या वेळी मी हे सर्व केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच करू शकलो’, याची मला आता जाणीव होत आहे.

त्यानंतर काही दिवसांनी आम्ही माहीम कोळीवाडा येथे समुद्रकिनारी असलेल्या एका जागेत रहायला आलो. तीही २ खोल्यांची जागा होती. त्या जागेत आम्ही ८ भावंडे आणि आई-वडील रहात होतो. या जागेत माझा दहावीचा (एस्.एस्.सी.चा) निकाला लागला. तेव्हा मी शाळेत पाचवा आलो होतो !

२. महाविद्यालयीन जीवन

मी ‘एस्.एस्.सी.’ उत्तीर्ण झाल्यावर माटुंगा येथील ‘रूपारेल’ महाविद्यालय येथे प्रवेश घेण्याचे ठरले. मला रूपारेल महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि मला तेथे ६ मासांसाठी ४० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आल्याचे सांगितले. महाविद्यालयात असतांना अभ्यास सुरळीत पार पडला. प्रत्येक वर्षी चांगले गुण मिळवून मी उत्तीर्ण होत गेलो. मी रूपारेल महाविद्यालयातून ‘स्टॅटिस्टिक्स’ घेऊन ‘बी.एस्.सी.’ झालो. याला ४ वर्षे लागली.’

– (पू.) श्री. सदाशिव सामंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.९.२०२०)


भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/485933.html