मुळशी तालुक्यातील (पुणे जिल्हा) आग दुर्घटनेतील मृत आणि जखमींना साहाय्य घोषित !

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाखांचे तर राज्य सरकारकडून ५ लाखांचे साहाय्य !

उरवडे गावाजवळ रासायनिक आस्थापनाला लागलेली आग

पुणे – मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक आस्थापनाला आग लागल्याने तेथील १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० सहस्र रुपये भरपाई देणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली, तर राज्य सरकार ५ लाख रुपयांचे साहाय्य देणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घोषित केले.


मावळ प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंद केला असून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे पवार यांनी सांगितले.