नाईट लाईफ !

आपण ज्या समाजात रहातो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. प्रत्येक मनुष्याला समाजऋण लागू होते. सामाजिक भान जपणे, हा याचाच एक घटक म्हणता येईल. अर्थात् ही जाणीव असण्यासाठी व्यक्ती केवळ सुशिक्षित असून चालणार नाही, तर ती सुसंस्कारितही हवी. शिक्षणाचे व्यावसायिकरण झाल्याने सध्या पदवी मिळणे सोपे झाले आहे; मात्र सुसंस्कार विकत मिळत नाहीत. त्यासाठी सात्त्विक आचार-विचारांचे परंपरागत वैभव असावे लागते. त्याचे बाळकडू लहानपणापासून मिळावे लागते. पूर्वीच्या काळी हिंदु संस्कृतीप्रधान शिक्षणात सुसंस्कार आपोआप मिळायचे. आता मात्र पाश्चात्त्य (कु)संस्कृतीचा पुरस्कार करणार्‍या शिक्षणातून असे सुसंस्कार मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळेच लाडावलेल्या आणि बिघडलेल्या तरुण-तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोनामुळे देशासमोर आर्थिक आणि जीवघेणे संकट उभे आहे. चंगळवादी तरुण-तरुणींना मात्र याचे काहीच सुवेरसुतक नाही. ते त्यांची ‘क्लब-पब’ची जीवनशैली बिनधास्तपणे जगत आहेत. मुंबईत दळणवळण बंदीच्या काळातही चालू असलेले हुक्का पार्लर, पब, बार यांवर धाडी घालण्यात आल्या. तेथे कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे आढळले. ‘क्लब-पब’च्या जीवनशैलीने नैतिकतेच्या सीमारेषा तर केव्हाच ओलांडल्या आहेत; परंतु आता कोरोनासारख्या जीवघेण्या संकटातही असे प्रकार चालू आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नशा आणि श्रीमंती यांची धुंदी असलेल्यांना सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय संकटाचे भान यातले काहीच शिवत नाही, हेच यातून लक्षात येते. संकटकाळातही स्वार्थ आणि व्यसन सोडता येत नसेल, तर त्याचा शेवट आपत्काळात कसा होईल ? हे सांगायला कुणी भविष्यवेत्ता नको.

प्रतिकात्मक छायाचित्र

पोलिसांची साशंक भूमिका !

‘नाईट लाईफ’ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्याचेच ‘क्लब-पब’, हुक्का पार्लर हे अविभाज्य भाग आहेत. कोरोनाचा जीवघेणा रोग रोखण्यासाठी दळणवळण बंदी आहे. मुंबईसह देशात मोठी गंभीर स्थिती असतांना पब आणि हुक्का पार्लर व्यावसायिक ‘नाईट लाईफ’ चालू ठेवतात, यामागे कुणाचा वरदहस्त आहे ? हे रोखण्यासाठी केवळ पोलिसी कारवाया पुरेशा आहेत का ? पोलिसी कारवाया आणि वस्तूस्थिती यांची समीकरणे पहाता मात्र ‘तू मार मी रडल्यासारखे करतो’, असा प्रकार चालू आहे, असेच वाटते. ‘पब-क्लबच्या मालकांना आणि पैसेवाल्या तरुणाईला पोलीस-प्रशासनाचा धाक नाही. त्यांना राजकीय नेत्यांचे अभय असते’, असेही लक्षात आले आहे. या ठिकाणी घातलेल्या धाडीही निवळ दिखाव्यासाठी असल्याचे कळते. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अशा धाडी घालण्यात आल्या होत्या; मात्र या अड्ड्यांना पुन्हा पेव फुटते, हेच यातून अधोरेखित होते. पोलिसी कारवाईनंतर परत ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे सर्व अवैध धंदे चालू होतात. एकूणच ठोस आणि पारदर्शक कारवाई करण्यात पोलिसांची स्वार्थांधता आड येते कि धनाढ्यांचा दबाव, याविषयी सरसकट विधान करणे कठीण असले, तरी एकंदरित स्थिती पहाता पोलीस प्रशासन पब-क्लबची कीड रोखण्यात अपयशी ठरते आहे, हे मात्र नक्की !

विदेशात कोरोनाविषयीच्या नियमांची कडक कार्यवाही केली जाते. एवढेच कशाला, यातून राजकारणी किंवा अतीमहनीय व्यक्ती यांनाही सूट दिली जात नाही. अशी शिस्तबद्धता असल्यामुळे अनेक देश कोरोना महामारी आटोक्यात आणू शकले, ही वस्तूस्थिती आहे. भारतात कुठल्याही नियमांचे सर्रास उल्लंघन का होते, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. समाजाला कशाचाही धाक राहिलेला नाही. त्यामुळे समाजात मनमानीपणा वाढला आहे. असे बेशिस्त वर्तन समाजाला घातक आहे. आताच्या आपत्काळात तरून जाण्यासाठी स्वयंशिस्त तर हवीच. स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनीही समाज बेशिस्तपणे वागत असेल, तर त्याला उत्तरदायी कोण ? कोरोनामुळे हिंदूंच्या सणांवर निर्बंध आहेत. आषाढी वारीवर निर्बंध आहेत. हिंदूंचे सण किंवा वारी यांसाठी नियम आणि ‘नाईट लाईफ’साठी सूट हे कसे काय ? याचे उत्तर सरकारी यंत्रणांनी द्यायला हवे. ‘राज्यातील ‘नाईट क्लब’ आणि त्याच्याशी निगडित तत्सम गोष्टी चालू ठेवण्यामागे भ्रष्ट व्यवहार तर झाला नसेल ना’, असा विचार सामान्य जनतेच्या मनात आल्यास तो चुकीचा ठरू नये. असे प्रश्न अनेक आहेत; मात्र त्याची उत्तरे मिळत नाहीत. यासाठी आता समाजानेच अशा घातक ‘नाईट लाईफ’ला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे.

राष्ट्रहित महत्त्वाचे कि तात्पुरता रोजगार ?

देशात गेल्या मासात अनुमाने दीड कोटी भारतियांनी त्यांची नोकरी गमावल्याची माहिती ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालातून समोर आली आहे. कोरोनाच्या काळात हातावरचे पोट असणार्‍यांचे हाल होत आहेत. मध्यमवर्गीय ते कनिष्ठवर्गीय समाजवर्ग आज जगण्यासाठी संघर्ष करत आहे. अशा स्थितीत चंगळवादाला पोसणार्‍या क्षेत्रात मात्र कोट्यवधींची उलाढाल चालू आहे. क्लब-पब येथे मद्य आणि अमली पदार्थांची विक्री हे जोडधंदे आलेच ! येथे गुन्हेगारी कारवायांना मोकळे रान मिळते. अमली पदार्थांच्या विक्रीमागे भारतविरोधी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे वारंवार उघड झाले आहे. देशाची भावी पिढी नेस्तनाबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पद्धतशीरपणे अमली पदार्थांचा वापर केला जात आहे. ‘क्लब’मुळे अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणात आणि सर्रासपण होत आहे.

मुंबईतील रात्रीचे जीवन अनेकांना रोजगार देत असल्याचे स्पष्टीकरण दिले जाते; मात्र एकंदर स्थिती पहाता देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे महत्त्वाचे कि रोजगार ? याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. देश संकटातून जात असतांना युवकांच्या मोठ्या सहभागाने संघटित प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. याही स्थितीत देशाच्या आर्थिक राजधानीत ‘रात्रीचे जीवन’ महत्त्वाचे वाटत असेल, तर ते चिंताजनक आहे. स्वामी विवेकानंद यांनी युवावर्गाच्या जडणघडणीला उद्देशून उद्बोधन करतांना उत्तम चारित्र्याची महती विशद केली होती. किंबहुना ‘चारित्र्यसंपन्न युवाच देशाचे भवितव्य घडवतील’, असे त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे तरुणाईला बिघडवणार्‍या ‘नाईट लाईफ’विषयी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे !