‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ प्राप्तकर्ते पहिले भारतीय शिक्षक डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती !

(डावीकडे) विद्यार्थ्यांना शिकवताना डिसले गुरूजी

मुंबई – ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसलेगुरुजी यांची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील डिसले गुरुजी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ प्राप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी गुरुजींच्या नावाने ‘स्कॉलरशिप’ चालू करण्यात आली होती. ‘ग्लोबल स्टुडंट प्राईस अ‍ॅकॅडमी’वरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीसाठी ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘ग्लोबल कोच’ नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जगभरातील १२ व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बार्शी येथील डिसलेगुरुजी यांचा समावेश आहे.