या घटनेतून प्रत्येकाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते ! असे सैनिक त्यांचे कर्तव्याचे पालन कसे करणार ?
सातारा, ३ जून (वार्ता.) – वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या ८ वर्षांच्या मुलीवर एका सैनिकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत तिला रेल्वेतून बाहेर फेकून दिल्याची घटना नुकतीच सातारा येथील लोणंद-वाठार रेल्वे मार्गावर घडली आहे. रात्री बलात्कार करतांना आरडा-ओरडा केला म्हणून रेल्वेतून त्या पीडित मुलाला बाहेर फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घायाळ मुलीला सातारा जिल्हा रुग्णालयात भरती केले असून संशयिताला १० घंट्यांमध्ये अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे येथील रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी दिली.
पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसह वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेसने देहलीला निघाले होते. रात्री झोपण्याच्या वेळी एका सैनिकाने त्या पीडित मुलीस झोपेत असतांनाच रेल्वेच्या शौचालयात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला; तेव्हा मुलीला जाग आली आणि तिने त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी आरडा-ओरडा केला; सैनिकाने ‘कुटुंबाकडे नेतो’, असे मुलीला सांगितले; मात्र दरवाजाजवळ घेऊन जात तिला रेल्वेतून बाहेर फेकून दिले. सुदैवाने रेल्वेचा वेग मंद असल्याने पीडित मुलगी गंभीर घायाळ झाली नाही. या वेळी रात्रीचे दीड वाजले होते. सकाळी ७.३० वाजता स्थानिकांच्या सहकार्याने याविषयी रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली. पीडित मुलीला कह्यात घेतले. तिने दिलेल्या वर्णनानुसार सैनिकाला अटक करण्यात आली. तो झाशी येथील सैन्यदलामध्ये कर्तव्यावर असल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.