इस्रायलमध्ये विरोधी पक्ष आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात !

पंतप्रधान नेतान्याहू यांचे सरकार पडण्याची शक्यता !

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील यामिनी पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट आणि विरोधी पक्षनेते याइर लॅपिड यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा चालू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आहे. नफ्ताली बेनेट हे बेंजामिन नेतान्याहू यांचे जवळचे सहकारी समजले जातात. नेतान्याहू यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळले आहे. बेंजामिन नेतान्याहू हे मागील १२ वर्षांपासून इस्रायलचे पंतप्रधान आहेत.

१. नेतान्याहू यांनी सत्तास्थापनेविषयीच्या घटनांवर म्हटले की, नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली म्हणजे इस्रायलच्या नागरिकांसमवेत धोका आहे. देश सध्या संकटातून जात असून राजकारण करण्याची ही वेळ नाही.

२. इस्रायलमध्ये मागील २ वर्षांत ४ वेळा निवडणुका पार पडल्या; मात्र बहुमतासाठी आवश्यक असणारा ६१ हा आकडा कोणत्याही एका पक्षाला गाठता आला नाही. त्यामुळे आघाडी सरकार स्थापन झाले आहे.