कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रात औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातन संस्था निर्मित देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावल्यामुळे चांगले परिणाम लाभले !

नकारात्मकता अल्प होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा अनेकांचा अभिप्राय !

कोल्हापूर – सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेचे साधक आणि धर्मप्रेमी यांच्या प्रयत्नांनंतर औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातनच्या वतीने सिद्ध केलेले देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावण्यात आले. या नामजपातील चैतन्यामुळे तेथील वातावरणात पालट होत असल्याचे लक्षात येत आहे. तसेच तेथील वातावरणातील नकारात्मकता अल्प होणे, रुग्णांना चांगले वाटणे आणि रुग्ण लवकर बरे होणे यांसह अनेक अनुभूती येत आहेत.

सांगली

सांगली जिल्ह्यात ६ ठिकाणी आधुनिक वैद्यांनी रुग्णालयांमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे सर्वांना ऐकू जाईल, अशा पद्धतीने नामजप लावला.

सातारा

१. येथील मंगलमूर्ती रुग्णालयामध्ये ५० खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’ आहे. तेथे सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी १ घंटा नामजप लावत आहेत.

२. सातारा येथील डॉ. पाडले यांनी त्यांच्या रुग्णालयात नामजप लावण्यास प्रारंभ केला असून त्यांच्या संजीवन रुग्णालयामध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे २४ घंटे नामजप लावण्यात येत आहे.

३. डॉ. (सौ.) अमृता जमदाडे, डॉ. दिनेश बक्षी यांनी त्यांच्या चिकित्सालयात देवतांचा नामजप लावला आहे.

कोल्हापूर 

१. कोल्हापूर येथील डॉ. चंद्रशेखर घोरपडे त्यांच्या रुग्णालयात, तसेच दिवेकर रुग्णालय येथे नामजप लावण्यात येत आहे.

२. कोल्हापूरमधील आयुर्वेद अर्कशाळेतील एका विभागासह येथील काही औषध दुकानांमध्ये नामजप लावण्यात येत आहे.

३. येथील त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे आणि डॉ. शशिकांत शेंडे यांनी त्यांच्या रुग्णालयात नामजप लावला. याचा रुग्णांना चांगला लाभ होत आहे.

साधकांनो, औषध दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये या ठिकाणी देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावून अध्यात्मप्रसाराच्या सेवेत सहभागी व्हा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील शहरांमध्ये ५० हून अधिक रुग्णालये आणि औषधांची दुकाने येथे हा नामजप लावण्यात आला आहे. तरी साधकांनी  त्यांच्या शहरातील आधुनिक वैद्य आणि औषध दुकाने यांना भेटून देवतांचे नामजप लावण्याविषयी सांगू शकतो. यामुळे तेथील सात्त्विकता वाढून रुग्णांनाही लाभ होईल !

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक