असे करणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच प्रकार होय !
पोलिसांकडून २ आरोपींना अटक
नागपूर – कोरोनाच्या संसर्गानंतर मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या खिशातील पैसे, दागिने, घड्याळ, भ्रमणभाष चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात प्रविष्ट झाल्या आहेत. रुग्णालयात उपचाराच्या वेळी रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत घालतांना त्याच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केली जात आहे. असे करणार्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (कोरोनाबाधित मृतदेहांकडील साहित्य चोरणारे हे कर्मचारी नसून चोरच आहेत. अशा लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)
येथील मेयो रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहाला प्लास्टिक पिशवीत घालण्याचे काम करणार्या एका खासगी आस्थापनातील कर्मचार्यांनी मृतांच्या खिशातील पैसे, अंगावरील सोन्याचे दागिने, भ्रमणभाष, महागडी घड्याळे पळवण्याचा सपाटाच लावला होता. ‘कोरोना प्रभागात सेवा देत असल्याने येथे कुणी आपली चौकशी करू शकणार नाही, त्यामुळे आपले बिंग फुटणार नाही’, असा या आरोपींचा समज झाला; मात्र चोरीच्या संदर्भात एका मृतकाच्या नातेवाइकाने येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
१ लाख १९ सहस्र रुपयांचा माल जप्त !
या तक्रारीचे अन्वेषण करतांना पोलिसांनी मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालणार्या ‘स्पीक अँड स्पॅन’ आस्थापनातील कर्मचार्यांची चौकशी केली; मात्र आरोपी काहीही बोलायला सिद्ध नव्हते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी गणेश डेकाटे, छत्रपाल सोनकुसरे यांनी गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी त्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख १९ सहस्र रुपये किमतीचे भ्रमणभाष आणि मौल्यवान साहित्य जप्त केले आहे.