वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी ११.५.२०२१ या रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज त्यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधिकेला मिळालेल्या पूर्वसूचना, आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. देहत्यागाविषयी मिळालेल्या पूर्वसूचना
अ. ‘८.५.२०२१ या दिवशी मला पू. माईणकरआजींची मुलगी दिसली. तेव्हा मला वाटले, ‘पू. आजी आता लवकरच देहत्याग करणार आहेत.’
आ. ९.५.२०२१ या दिवशी मी पू. माईणकरआजींची सेवा करणारी साधिका कु. गुलाबी धुरी हिला पाहिले. तेव्हाही मला वाटले की, ‘लवकरच पू. आजी देहत्याग करतील !’
२. सूक्ष्मातून पू. आजींचा आवाज येऊन त्यांनी ‘सर्व काही गुरुचरणी अर्पण कर’, असे सांगितल्याचे जाणवणे
एकदा मी पू. आजींच्या खोलीजवळून जात असतांना मला सूक्ष्मातून पू. आजींचा आवाज ऐकू आला. आजी मला म्हणाल्या, ‘‘तू चांगली साधना कर. सर्वकाही गुरुचरणी अर्पून टाक. घरातील बाकी सर्व परम पूज्य डॉक्टर बघणार आहेत. तू काही काळजी करू नकोस.’’
३. भोळा भाव असलेल्या आणि नामजपात रंगून जाणार्या पू. माईणकरआजी !
३ अ. दुसर्यांची अडचण समजून घेऊन त्याविषयी उपाय काढणे आणि सूक्ष्मातून उत्तर देणे : पू. आजी दुसर्यांची अडचण लगेच समजून घेऊन त्याविषयी उपाय सांगायच्या. माझे बोलणे त्यांना कळत नसले, तरी त्या सूक्ष्मातून समजून घेऊन मला उत्तर द्यायच्या. मी न विचारलेल्या प्रश्नांचीही त्या उत्तरे द्यायच्या. यावरून ‘संत हे गुरूंचेच दुसरे रूप आहेत’, हे लक्षात आले. परम पूज्यांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे पू. आजी माझ्याशी विश्लेषणात्मक बोलायच्या, उदा. परम पूज्यांच्या चरणांपासून दूर जायला नको; म्हणून आपण त्यांच्या चरणपादुका सतत आठवल्या पाहिजेत. त्या थोडेच बोलायच्या; पण त्यांच्या बोलण्यातून मला शिकायला मिळायचे.
३ आ. पू. आजींच्या खोलीत चांगले वाटणे आणि खोलीत, तसेच त्यांच्या भोवती पांढरा प्रकाश दिसणे : पू. आजी रुग्णाईत असल्या, तरी त्यांच्या खोलीत गेल्यावर मला चांगले वाटायचे. त्याच्या खोलीत आणि त्यांच्या भोवती मला सतत पांढरा प्रकाश दिसायचा. त्या नामजप करण्यात एवढ्या रंगून जायच्या की, त्यांना बाकीच्या कृतीची आठवण रहायची नाही.
३ इ. पू. आजींची शबरीसारखी भक्ती असणे आणि त्यांच्यासमवेत असतांना प.पू. गुरुदेवांसमवेत असल्याचे वाटणे : पू. आजींचा भोळा भाव होता. त्यांची भक्ती शबरीसारखी होती. ‘भक्तीभाव सतत कसा जागृत असायला पाहिजे ?’, हे त्या त्यांच्या कृतीतून शिकवायच्या. त्यांच्या समवेत असतांना बर्याच वेळेला मला ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत आहे’, असे वाटायचे.’
– कु. नंदा नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)
|