सांगली – केंद्रशासनाच्या ‘ई गव्हर्नन्स’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय, निमशासकीय कामात आणि खासगी सेवा पोचवण्यासाठी चालू केलेल्या ‘ई’ पंचायत (आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प) मध्ये जिल्ह्याने चांगले काम करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्हा दुसर्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रकारचे दाखले दिले जातात. त्याच प्रमाणे नोंदणीही केल्या जातात. त्यामुळे केंद्रशासनाच्या वतीने वरील उपक्रमांतर्गत सर्व दाखले संगणकावर देण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच कामामध्ये पारदर्शकता यावी, गावातील सर्व गोष्टींची संगणकावर नोंद व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात महाराष्ट्र देशात तिसर्या क्रमांकावर आहे.
या प्रकल्पाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील ९८ टक्के ग्रामपंचायतींची नमुना क्रमांक ८ आणि ९ ची नोंदवही ही संगणकीकृत करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यवस्थापक मंदार पोतदार, सर्व तालुका व्यवस्थापक आणि केंद्रचालक यांनी परिश्रम घेतले.