साधकांना प्रेमाने आधार देऊन त्यांना साधनेसाठी उभारी आणि बळ देणारे सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर !

सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी यवतमाळ जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. अशोक पात्रीकर

१. सौ. सोनल करोडदेव

१ अ. साधकांची प्रेमाने विचारपूस करून काळजी घेणे : पू. पात्रीकरकाका सर्वच साधकांची प्रेमाने विचारपूस करतात आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतात. दळणवळण बंदीला आरंभ होण्याआधी ते आमच्या घरी यायचे. तेव्हा ते सर्वांशी अगदी मनमोकळेपणाने बोलायचे. साधकांना काही त्रास होत असल्यास ते तत्परतेने नामजपादी उपाय सांगतात. ते स्पष्टवक्ते आहेत. आपले काही चुकले असल्यास ते लगेच तसे लक्षात आणून देतात.

१ आ. गुरुपौर्णिमेेच्या कालावधीत सतत सेवा करूनही नेहमी आनंदी अन् उत्साही असणे : पू. पात्रीकरकाका गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी ठरवलेले सभागृह पहायला प्रत्यक्ष यायचे. ते गुरुपौर्णिमेच्या कालावधीत साधकांची रंगीत तालीम घ्यायचे आणि त्यातील सर्व बारकावे अन् त्रुटी सहजतेने साधकांच्या लक्षात आणून द्यायचे. तेव्हा त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत सतत बसून रहावे लागूनही ते नेहमी उत्साही आणि आनंदी दिसायचे.

१ इ. अनुभूती – कुठल्याही औषधाने हात दुखायचा न थांबणे आणि पू. पात्रीकरकाकांनी दिलेला मंत्रजप म्हटल्यावर हाताचे दुखणे काही सेकंदांतच थांबणे : वर्ष २०२० मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर माझा उजवा हात फार ठणकायला लागला. सर्व औषधे घेऊन झाली आणि अन्य उपाय केले, तरी संध्याकाळी ६ वाजल्यापासून दुखत असलेला हात रात्री १२ वाजेपर्यंत दुखतच होता. शेवटी रात्री एक वाजता मी पू. पात्रीकरकाकांना भ्रमणभाष करून ‘मला पुष्कळ त्रास होत आहे’, असे सांगितले. त्यांनी मला लगेच मंत्रजप पाठवला. मी मंत्रजप करताच मला होत असलेला पुष्कळ त्रास काही सेकंदांतच बंद झाला. दुसर्‍या दिवशी पू. पात्रीकरकाकांनी स्वतः भ्रमणभाष करून माझी विचारपूस केली आणि ‘काहीही अडचण आल्यास कधीही भ्रमणभाष करू शकता’, असे मला सांगितले. देवाने मला ‘संतांच्या वाणीत किती चैतन्य असते !’, याची अनुभूती दिली. ही अनुभूती आमच्या घरातील सर्वांनीच घेतली. पू. पात्रीकरकाका आणि प.पू. गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. श्री. जयंत करोडदेव

२ अ. कोरोना महामारीच्या कालावधीत नोकरी करतांना पू. पात्रीकरकाका आवश्यक ती काळजी घेण्यास वारंवार सांगत असल्याने ‘ते स्वतःसमवेत असून त्यांच्यामुळे स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे वाटणे : कोरोना महामारीच्या कालावधीत माझी ‘ड्युटी’ ‘कंटेनमेंट झोन’मध्ये लागली. त्या वेळी पू. पात्रीकरकाका मला आवश्यक ती काळजी घेण्यासाठी वारंवार सूचना द्यायचे. मला ‘पू. पात्रीकाकाका माझ्या समवेत आहेत आणि माझ्याभोवती संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे सातत्याने वाटायचे. माझ्या समवेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली; परंतु प.पू. गुरुदेवांनी माझी काळजी पू. पात्रीकरकाकांच्या माध्यमातून घेतली. त्यामुळे मी कोरोनाच्या संसर्गापासून वाचू शकलो आणि ‘आजही माझ्याभोवती हे संरक्षक कवच आहे’, असे मला वाटते. त्यासाठी मी पू. पात्रीकरकाकांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.

३. सौ. दुर्गा पारधी

३ अ. पू. पात्रीकरकाकांमुळे घरात चैतन्य आणि संरक्षककवच निर्माण होणे : वर्ष २०१८ मध्ये पू. पात्रीकरकाका आमच्या घरी आले होते. त्या वेळी आमच्या घरी सत्संग झाला. तेव्हापासून आमच्या घरात चैतन्य निर्माण झाले आणि वास्तू शुद्ध झाली. त्यांच्यामुळे वास्तूभोवती संरक्षककवच निर्माण झाले. आम्हाला पू. पात्रीकरकाकांमध्ये सतत गुरुमाऊलीचे दर्शन होऊन आमची भावजागृती होते. गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

४. सौ. गीता रोडे

४ अ. पू. पात्रीकरकाकांच्या बोलण्यामुळे मनावरचा ताण नाहीसा होणे : एकदा पू. पात्रीकरकाकांचे यवतमाळ येथे मार्गदर्शन होते. त्या वेळी माझ्या यजमानांचा अपघात झाला होता. त्यामुळे मी मार्गदर्शनाला उपस्थित नव्हते. नंतर पू. पात्रीकरकाका मला आणि माझ्या यजमानांना भेटण्यासाठी आमच्या घरी आले. त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या मनावर आलेला ताण नाहीसा झाला.

४ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पू. पात्रीकरकाकांचे मार्गदर्शन वाचल्याने निराशा दूर होऊन मनाला उभारी मिळणे :मला कधी निराशा आल्यास मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पू. पात्रीकरकाकांचे मार्गदर्शन वाचते. १३.३.२०१८ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांचे सुंदर मार्गदर्शन छापून आले होतेे. त्या मार्गदर्शनातून ‘जिवंत रहाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे’, हे लक्षात येते. यामुळे माझ्या मनाला उभारी येऊन मन सकारात्मक होते.

५. श्री. लोभेश्‍वर टोंगे आणि सौ. गिरीजा टोंगे, वणी, यवतमाळ.

५ अ. साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणे : पू. पात्रीकरकाकांच्या माध्यमातून गुरुमाऊली आमच्यावर सतत कृपेचा वर्षाव करत आहेत. पू. पात्रीकरकाका वणी येथे आल्यावर सर्वच साधकांच्या कुटुंबियांशी मिळून मिसळून वागतात. त्यांच्या वागण्यात कधीच वेगळेपणा जाणवला नाही. ते कुटुंबातील प्रत्येकाची विचारपूस करून आवश्यक तेथे उपाययोजना सांगतात. ते प्रत्येक क्षणी आमच्या साधनेची काळजी घेतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक