सात्त्विक वास्तू 

वास्तूचे प्रकार

 • उत्तम – ज्या वास्तूच्या मध्यभागात सूर्यकिरण पडतात, त्याला ‘उत्तम वास्तू’ असे म्हणतात. अशा वास्तूत आरोग्य आणि साधना यांसाठीची ऊर्जा निर्माण होण्यास साहाय्य होते.
 • मध्यम – ज्या वास्तूच्या मध्यभागाच्या व्यतिरिक्तच्या भागात सूर्यकिरणे येतात. अशा वास्तूला ‘मध्यम वास्तू’ असे म्हणतात.
 • कनिष्ठ – ज्या वास्तूत सूर्यप्रकाश थेट न येता परावर्तित होऊन येतो. त्या वास्तूला ‘कनिष्ठ वास्तू’ असे म्हणतात.

आध्यात्मिक लाभ होण्यासाठी आवश्यक वास्तूची रचना

 • साधक साधना करण्यासाठी खोलीच्या छताचा आकार शेंडीकडील नारळाचा अर्धा भाग याप्रमाणे असावा. त्यामुळे साधकाचे साधनेत मन लवकर एकाग्र होते. प्राचीन ऋषींच्या कुटींचा आकार याप्रमाणेच होता.
 • साधना करण्यासाठी आवश्यक खोलीची लांबी, रूंदी आणि उंची अन्य खोल्यांच्या तुलनेत न्यून असावी.

वास्तू सजवतांना या गोष्टी टाळा !

सध्या वास्तूत सभागृहातील अंतर्गत सजावटीला महत्त्व दिले जाते. घर घेतल्यावर ‘आतील भाग एकदम चकचकीत, आरामदायी, आकर्षक असावा’, असे वाटते. त्यामुळे साहित्याची मांडणी करतांना विविध प्रकारच्या मूर्ती, त्यातही श्री गणेशमूर्ती ठेवल्या जातात. देवतेची मूर्ती ही नेहमी देवघरातच असावी, अन्यत्र मूर्ती ठेवल्यास त्याची पूजा-अर्चा होत नाही, त्यावर धूळ बसते. त्यामुळे एकप्रकारे देवतेचा अवमानच होतो. म्हणून असे करणे टाळावे.

स्नानगृह आणि शौचालय यांची दारे नेहमी बंद ठेवणे आवश्यक !

स्नानगृह आणि शौचालय यांची दारेही नेहमीच बंद ठेवली पाहिजेत. या ठिकाणी आपण मल-मूत्राचे विसर्जन करतो. शरिरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकत असतो. त्यामुळे तेथे त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. त्यांची दारे उघडी ठेवल्यास ही स्पंदने लगतच्या खोलीत पसरतात आणि त्याचा परिणाम त्या खोलीत रहाणार्‍यांवर होतो.

वास्तूविषयक काही सूत्रे

 • ‘आगगाडीचे डबे एका पाठोपाठ एक असतात, त्याप्रमाणे वास्तूची रचना नसावी.
 • वास्तूची दक्षिण बाजू पूर्णपणे बंद असावी. तेथे दारे किंवा खिडक्या नसाव्यात. दक्षिण दिशेला वस्तूंची अडगळ नसावी. अन्य दिशांच्या तुलनेत तेथे स्वच्छता अधिक असावी.
 • वास्तूच्या मुख्य दरवाज्याची चौकट आणि उंबरठा यांतून विशिष्ट घनीभूत दैवी स्पंदनांची निर्मिती होण्यास साहाय्य होते. त्यामुळे वास्तूमध्ये आसुरी शक्तींना प्रवेश करण्यास प्रतिरोध होतो. यासाठी मुख्य दरवाज्याला उंबरठा असणे आवश्यक आहे.
 • पूर्व आणि पश्चिम या दिशांना असणार्‍या खिडक्या अगदी समोरासमोर नसाव्यात. त्यामध्ये भेद असावा; कारण दोन्ही खिडकीतून एकाचवेळी वारा आल्याने वास्तूत दाब निर्माण होतो. त्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होते.
 • वास्तूची निर्मिती करतांना किमान २० टक्के लाकडांचा वापर करावा.
 • वास्तू भूमीला अगदी समांतर न रहाता काही प्रमाणात उंचावर असावी. त्यामुळे त्रासदायक भूगर्भलहरी आणि पाताळातून येणार्‍या अनिष्ट लहरी यांपासून वास्तूतील व्यक्तींचे रक्षण होते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०१७)

चैतन्य, सुंदरता आणि उत्साहवर्धक वातावरण यांनी युक्त सनातनच्या वास्तू !

सनातन आश्रम, रामनाथी

सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू असतात. त्यामुळे तेथे प्रचंड सात्त्विकता, चैतन्य आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे, तर आसपासचा निसर्गही अनुकूल आहे. ज्यामध्ये आंब्याच्या झाडाची आश्रमाजवळील बाजू आश्रमाजवळ झुकलेली आढळते. फुलझाडांना पुष्कळ फुले येतात आणि ती आश्रमाच्या बाजूने कललेली असतात, तर फळझाडांना पुष्कळ फळे येतात.

आश्रमातील लाद्या गुळगुळीत झाल्या आहेत आणि काही लाद्यांवर पाण्यात दिसते तसे प्रतिबिंब दिसते. आश्रमातील लाद्यांवर ‘ॐ’ आणि दैवी चिन्हे उमटली आहेत.

वास्तूची स्वच्छता व्यवस्थित करा !

स्वच्छतेचे नियोजन महिन्यातून एकदा करावे. तेव्हा वास्तूतील अनावश्यक साहित्य काढून टाकावे. नियमित स्वच्छतेमध्ये ज्या कृती करू शकत नाही, त्या सामूहिक स्वच्छतेच्या वेळी कराव्यात. बहुतांश घरांमध्ये कामवाली बाई झाडणे-पुसणे करते. वास्तूदेवतेची कृपादृष्टी रहाण्यासाठी स्वच्छता चांगल्या प्रकारे प्रतिदिन करावीच; मात्र मासातून एकदा व्यवस्थित करावी.