लवकरच पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी विनंती करणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरक्षणाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि केंद्रशासन यांचा आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रपतींना आमच्या भावना पत्राच्या स्वरूपात पोचवण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रितसर भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेण्यासाठी विनंती करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. ११ मे या दिवशी उद्धव ठाकरे यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवन येथे जाऊन मराठा आरक्षणाविषयी राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जलसंपदामंत्री जयंत पाटील हे उपस्थित होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘विधीमंडळात सर्वपक्षांनी एकमुखाने पूर्ण विचार करून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. हा जनतेचा निर्णय आहे. ‘मराठा आरक्षण मिळायला हवे’, ही आमची भावना आहे. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. ही लढाई शासनाच्या विरोधात नाही. शासन मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. या मागणीच्या विरोधात कोणताही पक्ष नाही. राज्यपालांना देण्यात आलेल्या पत्रावर आम्हाला लवकरात लवकर उत्तर मिळेल’, अशी आमची अपेक्षा आहे. राज्यपालांनीही पत्र लवकर राष्ट्रपतींकडे पाठवण्याचे आणि सहकार्याचे आश्‍वासन दिले आहे.’’