नेपाळमधील ओली सरकार कोसळले !

बहुमत सिद्ध करण्यात अपयश

काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सरकार कोसळले. ओली यांना २३२ पैकी केवळ ९३ मते पडली, तर १२४ मते त्यांच्या विरोधात पडली. मतदानाच्या वेळी १५ खासदार तटस्थ, तर ३५ खासदार अनुपस्थित राहिले.

नेपाळचे उपपंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पक्षाने ओली सरकारचा पाठिंबा काढल्याने ओली सरकार अल्पमतात आले होते. ओली यांच्या शिफारशीनंतर २० डिसेंबर २०२० या दिवशी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद विसर्जित करून निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. यावर या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी मासात राष्ट्र्रपतींचा निर्णय रहित करत ओली सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. ओली हे वर्ष २०१८ मध्ये नेपाळचे पंतप्रधान झाले होते. ओली यांनी अनेक भारतविरोधी आणि चीनधार्जिणे निर्णय घेतल्याने त्यांच्या विरोधात प्रचंड अप्रसन्नता होती.