१० मे २०२१ या दिवशी असलेल्या ‘१८५७ च्या स्वातंत्र्यसमर दिना’च्या निमित्ताने…
१. स्वातंत्र्यानंतरचे भारतीय शासनकर्ते ही चूक सुधारतील का ?
श्री. ज.द. जोगळेकर म्हणतात, ‘‘१८५७ च्या प्रस्फोटाच्या अखेरीस इंग्रजांना यश मिळाले. याचे कारण तांत्रिक गोष्टींत आहे. शस्त्रबळात नि युद्ध नेतृत्वात इंग्रज भारतियांपेक्षा श्रेष्ठ ठरले, हे होय. गेल्या १ सहस्र वर्षांत प्रत्येक निर्णायक लढाईत तांत्रिक गोष्टी शस्त्रबळ आणि युद्ध नेतृत्व यात भारतीय न्यून पडल्याने ग्रीक, तुर्क, मोगल नि इंग्रज यांनी भारतियांचा पराभव केला.’’
२. इंग्रजांच्या उन्मत्तपणाविषयी हिंदी शिपायांच्या मनात असलेला राग आणि इंग्रजांनी त्यांचा केलेला अनन्वित छळ
१८५७ चा प्रस्फोट म्हणजे पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची पहिली ठिणगी ! ‘१८५७ चा प्रस्फोट’ श्री. जोगळेकर लिखित ग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणात ‘भारतीय सैनिकांतील असंतोष केवढा व्यापक प्रमाणात आहे’, याची माहिती कॅप्टन मार्टिनो याने जनरल कॅप्टन बेचरला ५ मे १८५७ ला पाठवलेल्या पत्रात लिहिली आहे. त्यात कॅप्टन मार्टिनोने म्हटले आहे, ‘‘संपूर्ण हिंदी सैन्यात एक विलक्षण अस्वस्थपणा निर्माण झाला आहे, हे मला दिसत आहे. वादळ जवळ आले आहे, ते मला दिसते. त्या वादळाचा आवाजही मला ऐकू येत आहे; पण ते कुठे, कसे नि कधी चालू होईल ? ते मी सांगू शकत नाही. कुठल्याही कारणाने जर एखाद्या तळावर आग पेटली, तर ती सर्व देशभर पसरेल.’’
ख्रिस्तफर हिबर्ट यांच्या ‘दि ग्रेट म्युटिनी : इंडिया १८५०’ ग्रंथाचे उद्धरण देत श्री. जोगळेकर सांगतात, ‘‘इंग्रजांच्या उन्मत्तपणाविषयी हिंदी शिपायांच्या मनात असलेला राग हे प्रस्फोटाचे लक्षात न घेतले जाणारे कारण आहे.’’ इंग्रजांच्या अत्याचाराविषयी डॉ. सिल्व्हेस्टर म्हणतात, ‘‘पकडलेल्या शिपायांना नग्नावस्थेत जमिनीला बांधण्यात येत असे नि मग सर्व अंगावर डाग देण्यात येत. एका शिपायाला तंगड्या ओढून फाडण्याचा प्रयत्न झाला. मग ओढत त्याला नेण्यात आले. नेतांना त्यांच्या तोंडावर संगिनीने भोसकण्यात आले आणि अखेरीस त्याला भाजण्यात आले.’’
इतके अत्याचार होत असल्याचे ऐकून आणि बघूनसुद्धा भारतीय बंडखोरांचे साहस, धैर्य, अतुलनीय असल्याच्या ब्रिटीश लेखकांच्या नोंदी वाचल्या की, कुणाही खर्या भारतियाचे ऊर स्वतःच्या देशाकरता हुतात्मा झालेल्या आपल्या या पूर्वजांच्या ओजस्वी स्मृतींनी भरून येईल.
३. हिंदूंच्या शौर्याचे विशेष दिन निधर्मी शासनकर्त्यांनी जनतेच्या कृतीतून नष्ट व्हावेत, अशी व्यवस्था निर्माण केली हे लज्जास्पद !
श्री. ज.द. जोगळेकर म्हणतात, ‘‘संपूर्ण ब्रिटीश राजवटीत वर्ष १८५७ सारखा चित्तथरारक नि अभिमान वाटावा, असा दुसरा प्रसंग घडलेला नाही; म्हणून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे जसे राष्ट्रीय चळवळीचे महत्त्वाचे दिवस म्हणून साजरे होतात, तसाच १० मे हा ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा व्हावा, असे म्हणावेसे वाटते.’
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला ‘शिपाई गर्दी’ म्हणणारे राष्ट्रद्रोही लेखक कै. न.र. फाटक !‘१८५७ च्या प्रस्फोटा’चे वर्णन एका इतिहासकाराने ‘शिपाई गर्दी’ करावे यांची चर्चा करतांना श्री. ज.द. जोगळेकर म्हणतात, ‘‘हे लेखक केवळ इतिहासकार होते. क्रांतीच्या तत्त्वज्ञानाशी समरस होण्याची त्यांची वृत्ती नसावी, तसेच त्यांचा क्रांतीशास्त्राचा अभ्यास नसावा.’’ सर्वश्री सेन, मुझुमदार, फाटक यांच्या लिखाणाची चर्चा करतांना श्री. ज.द. जोगळेकर म्हणतात, ‘‘क्रांत्या या क्षुल्लक कारणाने घडतात; पण त्या क्षुल्लक कारणांसाठी नसतात.’ या ॲरिस्टॉटलच्या सिद्धांताचे योग्य प्रमाणात ग्रहण न झाल्याने कै. न.र. फाटक यांनी आपल्या ग्रंथास ‘शिपाई गर्दी’ नाव दिल्याविषयी महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांनी या शीर्षकाविषयीची असहमती नोंदवली आहे. |
– प्रा. अवधूतशास्त्री
(संदर्भ – धर्मभास्कर, मार्च २०००; साभार – दैनिक सामना, ३० जानेवारी २०००)