परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे सत्य सनातन धर्माचाच उत्सव !

‘वर्ष २०१५ पासून सनातन संस्थेमध्ये सप्तर्षि जीवनाडीपट्टीमध्ये ॠषि-मुनींनी लिहून ठेवल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हा जन्मोत्सव आरंभी एकच दिवस केला जात होता. वर्ष २०१९ मध्ये तो ६ – ७ दिवसांचा साजरा करण्यात आला. आता प्रत्यक्ष धार्मिक विधी करण्यावर मर्यादा आल्या असल्या, तरी प्रत्येक साधक जिथे आहे तिथे त्याच्या अंतर्मनात गुरुदेवांचा जन्मोत्सव निश्चितच साजरा करेल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे औक्षण करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (वर्ष २०१९)

१. श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा का करावा ?

‘गुरु’ हे शरीर नसून ते ‘तत्त्व’ आहे. श्री गुरूंना ना आदि, ना अंत ! मग ‘त्यांचा जन्मोत्सव साजरा का करायचा ?’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःचा जन्मोत्सव साजरा करण्याविषयी सांगितले नाही, तरी ‘आपण समाजातील संत, ज्योतिषी आणि नाडीवाचक यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा जन्मोत्सव का साजरा करतो ?’, असे प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतात. या प्रश्नांची मला सुचलेली उत्तरे येथे दिली आहेत.

१ अ. श्री गुरु शिष्यासाठी सर्वकाही करत असल्यामुळे ‘श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करणे’, ही त्यांच्या प्रती अंशतः कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असणे : ‘श्री गुरु हे भाव आणि भावना या दोन्हीच्या पलीकडे गेलेले असतात. त्यामुळे त्यांना शिष्यांनी ‘आपला जन्मोत्सव साजरा करावा’, असे कधीही वाटत नाही; मात्र ज्या श्री गुरूंनी शिष्यासाठी सर्वकाही केले आहे आणि सर्वकाही दिले आहे, त्या श्री गुरूंप्रती अंशमात्र कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक संधी असते; म्हणून श्री गुरूंचा जन्मोत्सव हा खर्‍या अर्थाने शिष्यांसाठीच असतो. श्री गुरूंचा जन्मोत्सव हा केवळ शिष्यांना आनंद देण्यासाठीच असतो; म्हणूनच श्री गुरु त्यांचा जन्मोत्सव करवून घेतात.

१ आ. प्रत्यक्ष दृश्य पहातांना मनुष्याचा भाव जागृत होतो, त्याचप्रमाणे श्रीगुरूंचा जन्मोत्सव प्रत्यक्ष पहातांना शिष्यांचा भाव जागृत होत असणे : ‘रामायण’, ‘महाभारत’, श्रीकृष्णाच्या बाललीला, भागवतातील गोष्टी हे सर्व प्रत्यक्षात घडले. हे सर्व दृश्य रूपात घडले. ती दृश्ये पहातांना मनुष्याचा भाव जागृत होतो आणि त्याच्या मनात ईश्वराविषयी प्रेम निर्माण होते. श्रीगुरूंचा जन्मोत्सव हे प्रत्यक्ष घडणारे दृश्य असल्यामुळे ते दृश्य पहातांना सहस्रो जिवांमध्ये भावस्थिती निर्माण होऊन कल्याणकारी पालट होतात. या जगात गुरुदर्शनापेक्षा सर्वाेच्च सात्त्विक दृश्य कुठले असू शकते का ?

१ इ. श्रीगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त सेवा-साधना करतांना शिष्याचा भाव अनेक पटींनी वाढत असणे : देव भावाचा भुकेला आहे. गुरु आणि देव हे एकच आहेत. त्यामुळे जेथे भाव असतो, तेथे गुरुतत्त्व आकर्षिले जाते. त्यासाठी शिष्याने त्याचा श्रीगुरूंप्रतीचा भाव व्यक्त करण्यासाठी मिळालेली एकही संधी सोडू नये. ‘श्रीगुरूंचा जन्मोत्सव’ ही तशी एक संधी आहे. पूर्ण वर्षभरात शिष्याचा श्रीगुरूंप्रती जेवढा भाव जागृत होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी जन्मोत्सवाच्या वेळी जागृत होतो. त्याला ‘श्री गुरूंसाठी काय करू आणि काय नको ?’, असे होते; म्हणून जन्मोत्सव हा शिष्याच्या आध्यात्मिक उत्कर्षासाठी ईश्वरनियोजित दैवी संधी आहे.

२. श्री गुरूंचा जन्मोत्सव कसा साजरा करावा ?

श्री गुरूंच्या ‘जन्मोत्सवा’ला ‘उत्सव’, असे म्हटले आहे. ‘उत्सव’ म्हटले की, ‘उत्साह’ आलाच ! ‘उत्सव’ ही मनाची उत्साहवर्धक स्थिती आहे. त्यामुळे जन्मोत्सव आधी तो मनात साजरा व्हावा लागतो.

२ अ. श्री गुरूंचा जन्मोत्सव प्रथमतः शिष्याच्या मनात साजरा होणे : श्री गुरूंचा जन्मोत्सव स्थुलातून साजरा करण्याआधी तो शिष्याच्या मनात साजरा होत असतो. शिष्याचे मन त्या आनंदात डुंबत असते. त्याला काही करून ‘आपण हा आनंद व्यक्त करावा’, असे वाटते. त्याच्या मनात भरून राहिलेला हा आनंदच पुढे ‘उत्सवाचे’ रूप धारण करतो.

२ आ. प्रत्येक शिष्य त्याच्या प्रकृतीनुसार जन्मोत्सवाची सेवा करून त्याचा आनंद व्यक्त करत असणे : ‘व्यक्ती तितक्या प्रकृती !’ या न्यायानुसार श्री गुरूंचे शिष्यही निरनिराळ्या प्रकृतीचे असतात. सर्वांचे आनंद व्यक्त करण्याचे स्वरूपही निरनिराळे असते. ‘सर्व प्रकारच्या शिष्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार श्री गुरूंप्रतीची कृतज्ञता व्यक्त करून आनंद घेता यावा’, यासाठीच जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे जन्मोत्सवानिमित्त श्रीगुरूंच्या प्रतिमेला घालण्यासाठी कुणी फुलांचा हार सिद्ध करतो, तर कुणी श्री गुरूंची महती गातो. कुणी ‘श्री गुरूंची शिकवण सर्वांना कळावी’, यासाठी त्यांच्यावर लिखाण करतो, तर कुणी श्री गुरूंचे धर्मप्रसाराचे कार्य सर्वांपर्यंत पोचवतो. अशा प्रकारे सर्वच शिष्यांना आनंद मिळतो.

३. कृतज्ञता

‘गुरुदेव, वरील सर्व लिखाण, माझ्या मन-बुद्धीच्या पलीकडचे आहे. हे सर्व श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी माझ्यावर केलेल्या कृपेचे लिखाण आहे.

श्रीगुरुचरणार्पणमस्तु !’

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई (११.४.२०२१)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे धर्माचा इतिहास घडणार असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव, म्हणजे सनातन धर्माचाच उत्सव असणे

प्रत्यक्ष घटना घडल्याविना इतिहास घडत नाही. भगवंताने अवतार धारण केल्याविना त्याची लीला घडत नाही. अनंत असलेल्या कालचक्रामध्येही परिवर्तन होते. तसेच नित्यनूतन असलेल्या सनातन संस्थेमध्ये ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव’ हा कालचक्राप्रमाणे झालेले ‘ईश्वरनियोजित परिवर्तन’ आहे. यामुळे ‘व्यक्ती, समाज आणि धर्म यांच्याशी संबंधित इतिहास घडणार असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव हा सनातन धर्माचाच उत्सव आहे’, यात संशय नाही !
– श्री. विनायक शानभाग