अमरावती येथे मद्याच्या नशेत असलेल्या महिला कर्मचार्‍याने पोलिसांशी घातली हुज्जत !

महिला कर्मचार्‍याने दारू पिणे आणि त्या नशेत अयोग्य कृती करणे हे नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे उदाहरण !

अमरावती – जिल्ह्यातील परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या लेखा विभागातील एका महिला कर्मचार्‍याने मद्याच्या नशेत धिंगाणा घालून कर्मचारी, आधुनिक वैद्य आणि पोलीस यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

या महिलेला कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र ती कुणाचेच ऐकण्याच्या सिद्धतेत नव्हती. त्यामुळे अचलपूर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले; मात्र महिलेने पोलिसांसमवेतही वाद घातला. तिला वैद्यकीय पडताळणीसाठी आणले असता ती नशेत असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेने कार्यालयात गोंधळ का घातला ? तिची तक्रार नेमकी काय होती ? याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. उपजिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यांकडून या महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा तिने त्यांनाही शिवीगाळ केली.