केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला

केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत !

मुंबई – केंद्र सरकारकडून कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात येणारा ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा ५ मेच्या रात्री थांबवण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केंद्र सरकारला सांगून हा पुरवठा थांबवल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. पुरवठा थांबल्याने सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि अन्य जिल्ह्यांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात होणारा ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने चालू करावा ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

कोल्हापूर – कर्नाटकच्या बेल्लारीमधून महाराष्ट्रात करण्यात येणारा ५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा रोखण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत ऑक्सिजनचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात होणारा ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने चालू करावा, अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरात केली. कोल्हापुरातून गोव्याला जाणारा १० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा हा बेल्लारीतून करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.