निपाणी (कर्नाटक), ६ मे (वार्ता.) – विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून, दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन निपाणी येथील हिंदुत्वनिष्ठ अभिनंदन भोसले यांनी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारतीय पुरातत्व खाते यांच्याकडे पाठवले आहे. या संदर्भात श्री. भोसले यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उत्तर प्राप्त झाले असून ‘आपला ई-मेल’ मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य विभागास पाठवण्यात आला आहे’, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगडावर ६४ हून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरांची पडझड झाली असून मूर्ती भग्नावस्थेत आहेत. ज्या शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची साक्ष या भूमीत आहे, त्यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. शिवरायांच्या सूनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे. तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता असून दर्ग्याचे ‘आर्.सी.सी.’ बांधकाम झाले आहे.