आरोप-प्रत्यारोप करून सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर खापर फोडले !

मराठा आरक्षण रहित झाल्याच्या निर्णयाला राजकीय रंग

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महाराष्ट्र शासनाने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रहित झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात आरक्षण रहित झाल्याचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप चालू झाले असून या सूत्राला राजकीय स्वरूप आले आहे.

मराठा आरक्षण रहित केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तातडीने बैठक झाली. या बैठकीनंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणी भाजपला उत्तरदायी ठरवण्याच प्रयत्न केला. दुसर्‍या बाजूला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यशासन न्यायालयात आरक्षण टिकवून ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.

मराठा आरक्षण रहित झाल्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर

मुंबई – मराठा आरक्षण रहित झाल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ५ मे या दिवशी पंढरपूर, पुणे, मुंबई, सोलापूर, जालना आदी ठिकाणी मराठा संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामध्ये पुणे, सोलापूर येथे शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पुणे येथे काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.