संभाजीनगर येथे रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणार्‍या २ पॅथॉलॉजी लॅबचालकांना अटक

१ लाख ८७ सहस्र ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोरोनाच्या आपत्काळात जनतेला लुटणार्‍यांना कठोर शासन करणे आवश्यक आहे, तरच इतरांवर जरब बसेल !

संभाजीनगर – कोरोनाच्या रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयातून चोरून ते अधिक दराने इतरांना विक्री करणार्‍या २ पॅथॉलॉजी लॅबचालकांना ३ मे या दिवशी रात्री ३ वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गेल्या १७ दिवसांत रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री करणारे ४ वेगवेगळे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. या रॅकेटमधील आरोपींमध्ये महापालिकेत काम करणार्‍या दोघांचाही समावेश आहे. या चौघांनाही न्यायालयाने १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चारही प्रकरणांतील आरोपींकडून आतापर्यंत जप्त करण्यात आलेले बहुतांश इंजेक्शन हे शासकीय रुग्णालयातून चोरलेले आहेत. या टोळ्यांचा संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या शहरांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.

३ मेच्या रात्री पुंडलिकनगर भागात गोकुळ स्वीट्ससमोर २ व्यक्ती रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार रात्री ३ वाजता सापळा रचण्यात रचून संदीप अप्पासाहेब चवळी आणि गोपाळ हिरालाल गांगवे यांना अटक करण्यात आली. हे दोघेही पॅथॉलॉजी लॅबचालक आहेत. त्यांच्याजवळून विविध आस्थापनांच्या ६ इंजेक्शनसह १ लाख ८७ सहस्र ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संदीप आणि गोपाळ यांच्याकडून जप्त केलेल्या इंजेक्शनवर नॉट फॉर सेल असे लिहिलेले आहे. याचाच अर्थ ते शासकीय रुग्णालयातील असण्याची शक्यता आहे.