मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय केंद्रशासनाने तात्काळ घ्यावा, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने पुढील दिशा दाखवली आहे. न्याय कुठे मिळेल ? याचे मार्गदर्शन न्यायालयाने केले आहे. आरक्षणावर निर्णय घेण्याचा अधिकारी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना विनंती करतो की, त्यांनी मराठा आरक्षणाविषयीचा निर्णय तात्काळ घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ५ मे या दिवशी मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी ‘ऑनलाईन’ संवादाद्वारे उद्धव ठाकरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करतांना वरील आवाहन केले. यासाठी ६ मे या दिवशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन आपणाला हवे ते साहाय्य करू. मराठा समाज सहनशील आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. आपण याचा अनादर करणार नाही, याची निश्‍चिती आहे.’