चीनकडून भारतातील कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न !

एकीकडे चीन भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी साहाय्य करणार असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे भारतात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंविषयी खिल्ली उडवतो, हे लक्षात घ्या !

बीजिंग (चीन) – चीनमधील ‘विबो’ या सामाजिक माध्यमातून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या ‘द कमिशन ऑफ पॉलिटिकल अँड लिगल अफेअर्स’ या संस्थेने एक छायाचित्र पोस्ट केले आहे. यात एकाबाजूला चीन उपग्रह प्रक्षेपित करत आहे, तर दुसरीकडे भारतात कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या चिता जळत आहेत, असे दिसत आहे. या छायाचित्राच्या खाली ‘चीन विरुद्ध भारत, जेव्हा चीन एखाद्या वस्तूला आग लावतो तेव्हा आणि जेव्हा भारत असे करतो तेव्हा’, असे लिहिले आहे. याचा अर्थ उपग्रह प्रक्षेपित होतांना खाली आग असते. म्हणजे ‘चीन आगीचा वापर विकासासाठी करतो, तर भारत मृतांना जाळण्यासाठी करतो’, अशी खिल्ली उडवण्यात आली आहे. नंतर ही ‘पोस्ट’ हटवण्यात आल्याचे कळते.