हिंदुत्वाचे कार्य करणारे निर्दयी आणि आक्रमक असल्याचे खोटे चित्र साम्यवादी विचारवंत अन् साहित्यिक यांच्याकडून रंगवले जाते; मात्र हिंदूंवर टीका करणाऱ्यांना नंदुरबारच्या घटनेतून चपराकच मिळेल !
नंदुरबार – कोलकाता येथील कोरोनाबाधित रुग्णाचा हावडा एक्सप्रेसमधे मृत्यू झाला. ही घटना नंदुरबार स्थानकात रेल्वे आल्यावर उघड झाली. यामुळे रुग्णासमवेत प्रवास करणारी त्याची पत्नी आणि २ लहान मुले हादरून गेली होती. त्यांच्या साहाय्यासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसह नंदुरबार रेल्वे स्थानकातील अधिकारी वेळीच धावून आले, तसेच त्यांनी कोरोनाच्या संसर्गाचा विचार न करता तो धोका पत्करत मृतदेह हाताळला. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे, तसेच त्या कुटुंबाला सुखरूपपणे परतीच्या प्रवासाला पाठवण्याचे कार्यही त्यांनी पार पाडले.
१. कोलकाता (बंगाल) येथील रहिवासी आनंद कोदाड (वय ४२ वर्षे) हे अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसने स्लीपर श्रेणीतून पत्नी सोमा आणि मुले नैतिक अन् सहेली यांच्या समवेत प्रवास करत होते. एक्सप्रेस २८ एप्रिल या दिवशी सकाळी ७.३५ वाजता नंदुरबार रेल्वेस्थानकात पोचल्यावर सौ. सोमा कोदाड यांनी धावत येऊन रेल्वे कर्मचाऱ्यांकडे विनवणी केली की, कोरोनामुळे आजारी असलेल्या पतीची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. आम्हाला तातडीने उपचार मिळवून द्या.
२. नंदुरबार रेल्वेस्थानकावरील वाणिज्य अधीक्षक प्रमोद ठाकूर आणि अन्य कर्मचारी यांनी रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांना रेल्वे डब्यातून खाली उतरवले. गाडी पुढे रवाना करण्यात आली.
३. स्थानकावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पडताळणी करून आनंद कोदाड हे मृत झाल्याचे घोषित केले. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
४. कुणीही परिचयाचे नसतांना अनोळखी गावात आता काय करायचे ? कायदेशीर पूर्तता कशी करावी ? लहान मुलांना कसे सांगायचे ? पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करावेत ? असे अनेक प्रश्न पत्नीसमोर होते.
५. वाणिज्य अधीक्षक प्रमोद ठाकूर आणि त्यांचे सहकारी यांनी सोमा यांना धीर दिला. गोरक्षक केतन रघुवंशी अन् त्यांचे सहकारी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण कोविड समितीचे गिरीष बडगुजर, त्यांचे सहकारीही साहाय्यासाठी आले.
६. मृतदेह कोविड रुग्णाचा असल्याने कुणीही तो हाताळायला सिद्ध नव्हते. यात बराच वेळ गेला. शेवटी केवळ हातमोजे घालून केतन रघुवंशी, गिरीष बडगुजर, प्रमोद ठाकूर आणि त्यांचे सहकारी यांनी मृतदेह उचलून तो स्ट्रेचरवर ठेवला. भर उन्हात दोन प्लॅटफॉर्म ओलांडून रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत मृतदेह आणला. शासकीय रुग्णालयाला कोरोना रुग्णाच्या मृत्यूची माहिती देत शववाहिनी मागवली. तोपर्यंत दुपारचे १२.१५ वाजले होेते.
७. मृतदेह योग्य प्रकारे बांधून अंत्यविधी करणे, त्यासंदर्भातील कायदेशीर नोंदी आणि कागदपत्रांची पूर्तता करणे यांसाठी केतन रघुवंशी यांनी प्रयत्न केले. प्रमोद ठाकूर यांनी सोमा कोदाड यांना मुलांसह सुखरूप कोलकाताला जाण्यासाठी परतीच्या प्रवासाची सोय करून दिली.
८. कोविड रुग्णाच्या मृतदेहाला हाताळणे म्हणजे आपला जीव दावणीला बांधण्याची जोखीमच आहे. असे असतांनाही कोदाड कुटुंबियांना साहाय्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे.
९. नंदुरबार रेल्वे स्थानकावर नुकतेच प्रशस्त कोविड केंद्र उभारण्यात आले आहे. तरीही कोविड रुग्ण किंवा त्याच्या मृतदेहाच्या हाताळणीसाठी लागणारी पुरेशी साधने अन् कर्मचारी अशा वेळी का उपलब्ध होऊ शकले नाहीत ?