गोव्यात गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला उत्तरदायी !
पणजी – गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला उत्तरदायी असल्याची अनेक उदाहरणे गोव्यात समोर येत आहेत. काणकोण येथे एका दुकानाचे कोरोनाबाधित मालक औषध आणण्यासाठी एका औषधालयात आल्याचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमात फिरत आहे. औषधालयात काम करणारा कर्मचारी संबंधित कोरोनाबाधित मालकाला ‘तुम्हाला बाहेर फिरण्याची संमती कुणी दिली ?’, असे विचारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण दिवसभर सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर तातडीने नियंत्रण न आणल्यास गोव्याची स्थिती कोरोना संसर्गाच्या दृष्टीने आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाने कोरोनाबाधित रुग्णांना गृहअलगीकरणात रहाण्याचा पर्याय दिलेला आहे आणि बहुतांश रुग्ण हाच पर्याय निवडतात. गृहअलगीकरणात असलेल्या रुग्णाने १७ दिवस घरच्यांसह कुणाच्याही संपर्कात येऊ नये, असा नियम आहे. वास्तविक कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा गृहअलगीकरणात असलेल्या रुग्णांवर पूर्णपणे लक्ष ठेवले जायचे. गृहअलगीकरणात असलेल्यांच्या हातावर ठसे, तसेच त्यांच्या घरावर ‘गृहअलगीकरण’, असा शिक्का लावला जात होता. त्याचप्रमाणे गृहअलगीकरणात असलेल्यांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व स्थानिक लोकप्रतिनिधींवर देण्यात आले होते. यामुळे या वेळी कोरोनाबाधित रुग्ण संपूर्ण १७ दिवस घराबाहेर पडत नव्हते; मात्र आता दुसरी लाट आल्यावर आणि कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागल्यानंतर गृहअलगीकरणात असलेल्यांवर शासनाचे कोणतेच लक्ष राहिलेले नाही. शासनाने हे दायित्व संबंधित विभागातील डॉक्टरांवर दिले आहे; मात्र ही प्रक्रिया योग्य प्रमाणात राबवली जात नाही. गोवा सरकारने पुन्हा गृहअलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर ठसे मारणे, घरावर शिक्का लावणे, तसेच रुग्णाचे दायित्व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देणे, हे पुन्हा चालू करण्याची मागणी जोर धरत आहे.