पुणे, २८ एप्रिल (वार्ता.) – रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप केले असून कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे आणि औषध पुरवठादार नुसार तात्काळ इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. रुग्णालयाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://pune.gov.in/corona-virus-updates/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही प्रकारची दिरंगाई, टाळाटाळ, कसूर होणार नाही याची दक्षता रुग्णालय प्रशासन आणि घाऊक विक्रेते यांनी घ्यावी. कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेतांना रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र आणि प्राधिकृत व्यक्तीचे छायाचित्र अन् ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याची खात्री करूनच घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे वितरण मुदतीत आणि दिलेल्या आदेशाप्रमाणे शासकीय दरात करावे.
कोविड-१९ वैश्विक साथीमध्ये काम करणारे पहिल्या फळीचे कार्यकर्ते उदा. आरोग्य सेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, अन्न आणि औषध प्रशासन, परिवहन इत्यादी विविध आस्थापनांचे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी १० प्रतिशत कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी दिले असून त्यास प्राधान्य देण्यात यावे, असे सांगितले आहे.
पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, पुणे ग्रामीण, नगरपालिका प्रशासन आणि नगर पंचायत यांसह आयुक्त औषध व प्रशासन, यांनी याविषयी वितरण तक्त्यानुसार वाटप होत असल्याची तसेच वितरीत औषधांचा उचित विनियोग होत असल्याची वेळोवेळी खात्री करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी. या आदेशातील क्र. ३ मधील भरारी पथकांनी वाटप तक्त्यानुसार वाटप आणि विनियोग याविषयी खात्री करून अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन / घाऊक विक्रेते यांच्यावर नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करावा, अशा सूचनाही परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत.