३ तपांचे (३६ वर्षांचे) वैवाहिक जीवन व्यतीत करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेद्वारे स्वतःत पालट घडवून दृढ श्रद्धेने आध्यात्मिक वाटचाल करणारे रामनाथी आश्रमातील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शाम आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. क्षिप्रा देशमुख !

पूर्वी भोपाळमध्ये रहाणारे आणि आता रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. शाम देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ. क्षिप्रा देशमुख यांच्या लग्नाला २९.४.२०२१ या दिवशी ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांचा मुलगा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख आणि त्यांची कन्या कु. निधी देशमुख यांना जाणवलेले आई-वडिलांमधील पालट पुढे दिले आहेत.

श्री. शाम आणि सौ. क्षिप्रा देशमुख यांच्या विवाहाच्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

श्री. शाम देशमुख

सौ. क्षिप्रा देशमुख

१. चिकाटीने व्यष्टी साधना आणि नामजप पूर्ण करणारे श्री. शाम देशमुख !

१ अ. भावनाशीलता न्यून होणे : ‘पूर्वी बाबांमध्ये (श्री. शाम देशमुख यांच्यामध्ये) भावनाशीलता पुष्कळ प्रमाणात होती. गावात असणारे त्यांचे बंधू आणि पुतण्या यांनी काही सांगितल्यास त्या विचारांतून बाहेर पडायला त्यांना १५ – २० दिवस लागायचे. आता हे प्रमाण पुष्कळ न्यून झाले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या संदर्भात एक प्रसंग घडला. त्या वेळी १५ – २० मिनिटांतच ते त्या प्रसंगाच्या विचारप्रक्रियेतून बाहेर आले.

कु. निधी देशमुख

१ आ. नातेवाइकांनी मुलांच्या लग्नाचा विषय काढल्यावर अस्थिर न होता स्थिर राहून त्यांना शांतपणे उत्तर देणे : पूर्वी नातेवाइकांनी आमच्या (कु. निधी आणि श्री. निषाद यांच्या) लग्नाचा विषय काढल्यावर किंवा आध्यात्मिक त्रासामुळे आईची शारीरिक स्थिती खालावल्यावर बाबा ४ – ५ दिवस अस्थिर व्हायचे. आता साधनेमुळे त्यांच्या स्थिरतेमध्ये पुष्कळ वाढ झाली आहे. आईची शारीरिक स्थिती खालावल्यावर तिची दृष्ट काढणे, तिला नामजपादी उपायांसाठी साहाय्य करणे, असे प्रयत्न ते करतात. कुणी नातेवाइकांनी आमच्या लग्नाचा विषय काढल्यावर ते शांतपणे त्यांना उत्तर देतात. आमच्या काही नातेवाइकांनी बाबांना सांगितले, ‘‘तुमचे कर्तव्य म्हणून तरी तुम्ही मुलांचे लग्न करा. आवश्यकता पडली, तर बळजोरी करा; पण त्यांचे लग्न करा.’’ तेव्हा बाबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, ‘‘मुलांचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले आहेत. त्यांचे त्यांना कळते. त्यामुळे मी त्यात हस्तक्षेप करणार नाही.’’

१ इ. नामजप आणि सारणी लिखाण पूर्ण करण्याची चिकाटी अन् तळमळ वाढणे : बाबांची नामजप आणि सारणी लिखाणाची चिकाटी पुष्कळ वाढली आहे. पूर्वी काही काम असल्यास ते त्यांच्या नामजपाच्या वेळेत पालट करायचे. आता ते सहसा नामजपाच्या वेळेत पालट करत नाहीत, तसेच नामजपाचा ठराविक कालावधी, उदा. ४५ मि. किंवा १ घंटा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची सारणी लिखाणाची तळमळही वाढली आहे. पहिले काही आठवडे त्यांनी आमच्याकडून स्वयंसूचना बनवायला शिकून घेतले. आता ते त्यांचे लिखाण पूर्ण करतात.

१ ई. साधनेमुळे नेत्रांची क्षमता वाढून उपनेत्र (चष्मा) न लावताही वाचन करता येणे : भोपाळमध्ये असतांना बाबांना उपनेत्र (चष्मा) होता. वर्ष २०१७ पासून रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांनी उपनेत्र लावणे बंद केले आहे. असे असतांनाही दैनिक वाचणे, संगणकीय धारिका वाचणे आणि इतर कामे करणे, हे ते सुरळीतपणे करतात. ‘नामजपामुळे नेत्रज्योती चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत’, असा त्यांचा भाव असतो.

श्री. निषाद देशमुख

१ उ. मुलाकडे ‘साधक’ म्हणून पहाणे आणि त्याची अडचण समजून घेऊन स्वतःहून त्याला साहाय्य करणे : ‘वर्ष २०१९ मध्ये सेवा असल्याने रात्री १ – २ वाजेपर्यंत खोलीत येणे आणि सकाळी ६ वाजता परत आश्रमात जाणे, असा माझा दिनक्रम झाला होता. त्या वेळी मला साहाय्य व्हावे; म्हणून बाबा स्वतःहून माझे कपडे इस्त्री करून ठेवत होते. कधी सेवेनिमित्त मला गोवा राज्याच्या बाहेर जायचे असल्यास बाबा माझी ‘बॅग’ही भरून ठेवायचे. या कृती करतांना ते कधीही स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत. ते मला भ्रमणभाष करून ‘दुसर्‍या दिवसासाठी कोणत्या कपड्यांना इस्त्री करायची ? किंवा बॅगेत कोणते कपडे भरायचे ?’, हे विचारायचे. एकदा बाबा मला म्हणाले, ‘‘मी माझी सेवा म्हणून मी हे सर्व करतो. तुझ्या जागी दुसरा साधक असता, तरी मी असेच केले असते.’’ – श्री. निषाद देशमुख

१ ऊ. प्रीतीमध्ये वाढ होणे : काही महिन्यांपूर्वी आमच्या खोलीत एक फुलपाखरू येऊन बसले. ते फुलपाखरू जवळ-जवळ आठवडाभर खोलीतच होते. त्याला घालवले, तरी ते परत यायचे आणि एकाच जागी बसून रहायचे. त्या फुलपाखराला काही खायला मिळावे; म्हणून बाबा त्याच्याजवळ एका चमच्यात गूळपाणी घालून ठेवायचे. यातून त्यांची अन्य जिवांवरील प्रीती लक्षात आली.

२. संतांचे आज्ञापालन, तसेच भावाकडून भक्तीकडे प्रवास करणार्‍या सौ. क्षिप्रा शाम देशमुख !

२ अ. संतांचे आज्ञापालन करण्यासाठी तीव्र शारीरिक कष्ट होत असतांनाही बसून सेवा करणे : मार्च २०२० पासून चालू झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात आईची शारीरिक स्थिती नाजूक झाली होती. तिला काही वेळ बसणेही कठीण होऊन धाप लागत होती. त्यामुळे ती झोपूनच नामजप, सेवा इत्यादी करायची. एका संतांनी भ्रमणभाषवर आईची चौकशी करून ‘जेवढी शक्य आहे, तेवढी सेवा करा’, असा निरोप दिला. त्या वेळी संतांनी सांगितले आहे, तर ‘सेवा केलीच पाहिजे’, असा विचार करून आई प्रयत्नपूर्वक दीड ते दोन घंटे बसून हिंदी ग्रंथातील लिखाण तपासण्याची सेवा करायची आणि आताही करत आहे.

२ आ. नामजप किंवा सेवा करतांना देहभान विसरल्याने शारीरिक त्रासाची जाणीव न होणे : आईला असलेल्या तीव्र शारीरिक वेदनांमुळे तिला सलग पुष्कळ वेळ बसणे शक्य होत नाही. ती अधिकाधिक ३० ते ४५ मिनिटेच बसू शकते. असे असूनही अलीकडे नामजप किंवा सेवा करतांना तिला स्वतःच्या त्रासाचे विस्मरण होते आणि ती कधी-कधी सलग ३ – ४ घंटे बसून नामजप किंवा सेवा करते. नामजप किंवा सेवा पूर्ण झाल्यावर तिला स्वतःच्या वेदनांमध्ये वाढ झालेली लक्षात येते.

२ इ. आईला व्यवहारातील अनेक सूत्रांचे विस्मरण होणे; पण भावामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प्रीतीमुळे सहसाधिकेचा वाढदिवस तिच्या लक्षात रहाणे : वयानुसार आईचे विसरण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी कधी बोलतांना खंड पडल्यास ‘आपण काय बोलत होतो ?’, याचे तिला विस्मरण होते. असे असूनही परात्पर गुरु डॉक्टरांशी अनेक वर्षांपूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी केलेले मार्गदर्शन मात्र आईच्या स्मरणात राहिलेले असते.

​याच प्रकारे आईला तिचे भाऊ, पुतणे इत्यादींचे वाढदिवस क्वचित् स्मरणात रहातात; पण काही सहसाधिकांचे वाढदिवस मात्र अचूक लक्षात रहातात. त्या दिवशी ती स्वतः भ्रमणभाष करून किंवा आम्हाला सांगून संबंधितांना शुभेच्छा देते.

२ ई. भावातून भक्तीकडे होत असलेला साधनेचा प्रवास ! : पूर्वी आईची भावजागृती झाल्यावर भावावस्थेमुळे तिला अश्रू येऊन स्वतःवरील नियंत्रण न्यून व्हायचे. मागील ५ – ६ मासांत हे प्रमाण न्यून झाले असून भावजागृती झाल्यावरही आई स्थिर असते. या संदर्भात तिने एका संतांना विचारल्यावर संतांनी सांगितले, ‘‘तुमची भावातून भक्तीकडे वाटचाल होत आहे !’’

२ उ. चित्रपटातील गीत ऐकल्यावर देवाचे स्मरण होऊन भाव जागृत होणे : मार्च २०२१ मध्ये आम्ही एका नातेवाइकांकडे गेलो होतो. त्यांनी आईला हिंदी चित्रपटातील एक गीत ऐकवले. ते गीत प्रियकराविषयी होते, तरी ‘ते देवाच्या संदर्भातील आहे’, असे वाटून ते गीत ऐकून आईची भावजागृती झाली. यातून ‘देवाप्रती तिचे अनुसंधान पुष्कळ वाढले आहे’, असे लक्षात आले.’

– कु. निधी देशमुख आणि श्री. निषाद देशमुख (श्री. शाम आणि सौ. क्षिप्रा देशमुख यांची मुलगी अन् मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.३.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक