राज्यात १५ दिवस दळणवळण बंदी लागू करणे अत्यावश्यक ! – सुदिन ढवळीकर, मगोप
पणजी – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात १५ दिवस दळणवळण बंदी लागू करावी, अशी मागणी मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘‘गोमंतकियांचे प्राण वाचवण्यासाठी शासनाने कठोर निर्णय घेणे आता काळाची आवश्यकता आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येने पूर्वीचे सर्व उच्चांक पार केले आहेत. गोव्यातील आरोग्ययंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलेला आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना खाटा शोधण्यासाठी फिरावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने राज्यात १५ दिवस दळणवळण बंदी लागू करावी. राजकारण बाजूला ठेवून गोमंतकियांचे हित जपणे आवश्यक आहे.’’
कर्नाटकात दळणवळण बंदी लागू होऊ शकते, तर मग गोव्यात का नाही ? – आलेक्स रेजिनाल्ड, आमदार, काँग्रेस
मडगाव – रुग्णांना रुग्णालयात भरती होण्यासाठी १० ते ११ घंटे वाट पहावी लागत आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी आणखी ८ दिवस लागणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्यावर अतिरिक्त खाटा उपलब्ध करूनही त्याचा कोणताही लाभ होणार नाही. रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात साधनसुविधा उपलब्ध नाहीत. आता आरोपप्रत्यारोप करण्याची वेळ नाही. मी शासनावर टीका करत नाही, तर उपाययोजना म्हणून राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याची मागणी करत आहे. कर्नाटकात दळणवळण बंदी लागू होऊ शकते, तर मग गोव्यात का नाही ? निदान ज्या भागांत कोरोनाचा संसर्ग अधिक आहे, अशा भागात दळणवळण बंदी लागू करावी. मी सद्यःस्थितीविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहे.