भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे, हे सर्वज्ञात आहे. जगभरातील जिज्ञासू आपल्याकडे साधना जाणून घेण्यासाठी येतात. साधनेची अवीट गोडी ते चाखतात आणि साधना करून स्वतःच्या जीवनाचे सार्थक करून घेतात. आपल्याकडे तर पावलोपावली भक्तीमार्गी लोक आहेत. असे असूनही काही पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी मंडळी, साम्यवादी आदी लोक मात्र अध्यात्माला थोतांड ठरवण्यासाठी अहोरात्र आटापिटा करतात. यासाठी जणू सुपारी घेतल्याप्रमाणे ते या कामी स्वतःला जुंपून घेतात.
सध्या आपण सर्वच जण कोरोनाच्या कठीण काळाचा प्रतिदिन अनुभव घेत आहोत. त्यातच भरीस भर म्हणून आज कोरोनामुळे भारतात अभूतपूर्व भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठे लसींची कमतरता आहे, तर कुठे औषधांचा काळाबाजार होत आहे. कुठे ऑक्सीजनच मिळत नाही, तर कुठे त्याची गळती होत आहे. कुठे रुग्णालयांत रुग्णांना जागाच शिल्लक नाहीत, तर कुठे रुग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांनाच कोरोनाचा संसर्ग होत आहे. प्रतिदिन उद्भवणार्या नवनवीन संकटांचा सामना करतांना शासकीय यंत्रणांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ‘ही समस्या सोडवणे आपल्या आवाक्यातील नाही’, असे चित्र निर्माण झाले आहे. नुकत्याच मुंबईतील एका महिला डॉक्टरने मुंबईतील कोरोनाची भयावहता सांगणारा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात कोरोनाच्या परिस्थितीचे वर्णन करतांना तिलाही रडू कोसळले होते. यावरून या संकटाची तीव्रता लक्षात यावी.
अशातच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील एका कार्यक्रमात बोलतांना ‘कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करेल’, असे विधान केले. एवढेच नव्हे, तर ‘कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सुस्वर रामचरितमानसचे पठण करणे हेही वरदान ठरू शकते’, असेही त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्र्यांच्या या विधानाकडे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही पहाता येईल. आज कोरोना विषाणूपासून प्रत्येक जण स्वतःचे संरक्षण कसे होईल, या दृष्टीने पहात आहे. देशातील जनतेवर आलेल्या संकटापासून त्यांचे रक्षण करणे, हे संरक्षणमंत्र्यांचे किंवा सरकारचे दायित्व आहे. त्या दृष्टीने त्यांनी सुचवलेली शाश्वत उपाययोजना कोरोनाविरुद्धच्या लढाईत सिंहाचा वाटा उचलेल, यात शंका नाही. तथापि सरकार केवळ बौद्धिक उपदेश करणार कि त्या दृष्टीने कृतीच्या स्तरावरही काही कार्यक्रम आखणार ?, हे पहाणे महत्त्वाचे आहे. खरेतर संकटकाळात नव्हे, तर त्यापूर्वीपासून साधना केली तर रक्षण होऊ शकते, हेही लक्षात घेतले पाहिजे. आता सिंह यांच्या विधानावर काही नास्तिकतावादी, पुरो(अधो)गामी मंडळी बिळातून बाहेर येऊन आरडाओरड करतील; पण त्याचा काही एक उपयोग होणार नाही. रामचरित्रमानसचे श्रद्धेने पठण करणार्याला त्याचे फळ निश्चित मिळते, अशी भाविकांची श्रद्धा असते. तसे पहायला गेले, तर संरक्षणमंत्र्यांच्या विधानाला वैज्ञानिक आधारही आहे; कारण ‘देवावर श्रद्धा असणार्या आस्तिक रुग्णांचे आजारातून बरे होण्याचे प्रमाण इतर रुग्णांपेक्षा अधिक आहे’, असे अनेक संशोधनातून समोर आलेले आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या गीतरामायणाच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात एका दर्शकाने ‘मी माझ्या आजारी वडिलांना दूरभाषवरून गीतरामायण ऐकवले आणि त्यांना बरे वाटले’, अशी अनुभूती सांगितली होती. ही अध्यात्माची शक्ती आहे. सध्याच्या कोरोना काळात दिवसेंदिवस हाताबाहेर जाणार्या परिस्थितीसमोर हतबल होऊन जनता आता स्वतःहूनच देवाचा धावा करत आहे. अनेक ठिकाणी अग्निहोत्र, होमहवन यांसारखे विधी केले जात आहेत. मानवाचे स्वतःचे सर्वच प्रयत्न संपतात, तेव्हा तो भगवंताला शरण जातो आणि परमदयाळू भगवंत त्याला सर्वोतोपरी सहाय्य करून दुःखातून बाहेर काढतो, याचे आपल्याकडील संतकथांमध्ये शेकडो दाखले आहेत. राजनाथ सिंह यांना कोरोनाविरुद्धच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म हे औषधाप्रमाणे, तर कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी सुस्वर रामचरितमानसचे पठण करणे, हे वरदान म्हणूनच वाटते. सध्या कोरोनाकाळात ‘आभाळच फाटले, तर ठिगळं तरी कुठे कुठे लावणार ?’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनावर लोकांनी वैद्यकीय उपचार तर घ्यावेच; पण आता खरोखरच ‘रामभरोसे’ रहाण्याची, म्हणजे साधना करून आपला संपूर्ण भार देवावर सोपवण्याची आवश्यकता आहे. देवाचा आधारच मनाला एक प्रकारची निश्चिंतता आणि उभारी देतो. मनाला शांतीची अनुभूती देतो. त्या दृष्टीने आता वैद्यकीय उपचारांच्या जोडीला आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे.
सरकारकडून कृतीची अपेक्षा !
राजनाथ सिंह यांनी दिलेले बौद्धिक चांगले आहे; पण त्याप्रमाणे कृती होणे अपेक्षित आहे. म्हणजे शासकीय स्तरावरूनच जनतेला साधनेचे धडे दिले गेले पाहिजेत. त्यासाठी शासकीय स्तरावरील प्रत्येकाने प्रथम स्वतः साधना केली पाहिजे. एकीकडे सरकार धर्म आणि अध्यात्म यांचे महत्त्व जरी मान्य करत असले, तरी दुसरीकडे धर्म अन् अध्यात्म यांचे धडे गिरवणारी केंद्रे असलेली मंदिरे मात्र कोरोनाचे निमित्त करून बंद करत आहे. हा विरोधाभास नव्हे का ? मंदिरांचे सरकारीकरण करून तेथील चैतन्यस्रोत नष्ट केला जात आहे. ही एकप्रकारे धर्महानी आहे. ही सर्व स्थिती पालटून केवळ बौद्धिक न देता तत्त्वज्ञान कृतीत कसे आणता येईल, हे पहायला हवे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा कठीण क्षण येतो की, त्या वेळी त्याला देवाशिवाय कुणीच आधार नसतो. त्या वेळी त्याला देवाचे, साधनेचे महत्त्व पटू लागते. आता कोरोनाच्या काळात अनेकांची अशी स्थिती झालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे या संकटकाळात सर्वांनीच साधना करून आध्यात्मिक बळही प्राप्त करून घ्यायला हवे. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या जवळ त्याचे नातेवाईकही जाऊ शकत नाहीत, तसेच मृत कोरोनाबाधित व्यक्तीवर त्यांना अंत्यसंस्कारही करता येत नाहीत, हे आपण पाहिले आहे. यातून कोरोनानेे नातेसंबंधांची मर्यादा ठळकपणे अधोरेखित होत आहे. अशा कठीण काळात केवळ आणि केवळ देवच आपल्या समवेत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. शेवटी ‘कठीण समय येता, देवच कामास येतो’, हेच खरे !