चीनने भारताला कितीही साहाय्य करण्याच्या गप्पा मारल्या, तरी त्याच्या साहाय्याचा भारताला किती लाभ होईल, हेही पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच नंतर चीनकडून ‘आम्ही संकटाच्या काळात भारताला साहाय्य केले’ असे शेखी मिरवण्याचाही प्रयत्न केला जाईल, हे नाकारता येत नाही !
बीजिंग (चीन) – भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ घंट्यांत ३ लाख १५ सहस्र रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत भारताला साहाय्य करण्याची सिद्धता चीनने दर्शवली आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले की, संपूर्ण मानवजातीचा शत्रू असलेल्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकजूटता आणि परस्पर सहकार्य यांची आवश्यकता आहे. भारतातील कोरोना स्थितीवर चीनचे लक्ष असून वैद्यकीय उपकरणे आणि आवश्यक गोष्टींचा तुटवडा यांची नोंद घेतली आहे. महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन भारताला शक्य तेवढे साहाय्य करण्यास सिद्ध आहे.