ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या हातात द्या ! : देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची पंतप्रधान मोदी यांना सूचना

नवी देहली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आणि तमिळनाडू राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत ऑक्सिजनच्या तुटवड्याविषयी सर्व मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे साहाय्य मागितले. या वेळी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘ऑक्सिजन प्लांटचे नियंत्रण सैन्याच्या हाती द्या’, अशी सूचना केली.

केजरीवाल म्हणाले की, राज्यांना ऑक्सिजन लवकर मिळावा, यासाठी सैन्याचे साहाय्य घेणे आवश्यक आहे. आकाशमार्गानेसुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. ऑक्सिजन एक्सप्रेसची सुविधा देहलीमध्ये चालू झाली पाहिजे. त्यासह देशात लस एकाच किमतीत देणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांना वेगवेगळ्या किमती का ?, असा प्रश्‍नही केजरीवाल यांनी उपस्थित केला.

बैठक चालू असतांना केजरीवाल यांनी ती केली लाईव्ह केल्याने पंतप्रधान मोदी यांनी फटकारले !

केजरीवाल यांच्याकडून क्षमायाचना !

ही बैठक चालू असतांना केजरीवाल यांनी त्यांचे भाषण दूरचित्रवाणीवरून थेट प्रक्षेपित केले. हे लक्षात येताच पंतप्रधान मोदी यांनी केजरीवाल यांना रोखले आणि फटकारले. मोदी म्हणाले, ‘अशा अंतर्गत बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे आपली परंपरा आणि शिष्टाचार यांच्या विरोधात आहे. हे योग्य नाही. आपल्याला नेहमी याचे पालन केले पाहिजे.’ यानंतर अरविंद केजरीवाल यांनी क्षमा मागत ‘पुढच्या वेळी हे लक्षात ठेवू’ असे सांगितले. तसेच ‘आपण दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल’, असे आश्‍वासनही दिले. दुसरीकडे देहलीच्या मुख्यमंत्री कार्यालयाने यासंबंधी खुलासा करत, या बैठकीचे थेट प्रक्षेपण केले जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीही सूचना दिली नव्हती, असा दावा केला आहे.