कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक गणेश भोगटे यांना अटक

कुडाळ –  शासकीय कर्तव्य बजावत असतांना कार्यालयीन कक्षात येऊन शिवीगाळ केली, तसेच मारण्यासाठी खुर्ची उगारली अन् नगरसेवक गणेश अनंत भोगटे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक भोगटे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० चे गणेश भोगटे नगरसेवक आहेत. या प्रभागातील ‘शिवाजी पार्क’ येथील पाण्याच्या ओहोळामध्ये अतिक्रमण झाल्याची तक्रार नगरसेवक भोगटे यांनी नगरपंचायत कार्यालयात केली होती. त्यामुळे ‘शिवाजी पार्क’ मधील एका क्षेत्राची मोजणी करण्याचा प्रस्ताव ५ एप्रिल २०२१ या दिवशी नगरपंचायत कार्यालयाकडून भूमी अभिलेख कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्या क्षेत्रामधील सर्वेक्षण क्रमांक ९ची मोजणी करून घेण्याचे प्रस्तावित होते. त्याविषयी भूमी अभिलेख कार्यालयाकडून या प्रस्तावास ७ एप्रिल २०२१ या दिवशी संमती प्राप्त झाली होती; परंतु त्या सर्वेक्षण क्रमांकाच्या व्यतिरिक्त लगतच्या इतर सर्वेक्षण क्रमांकाच्या क्षेत्राची मोजणी करणे आवश्यक वाटत असल्याने फेरप्रस्ताव सादर करून आम्ही संपूर्ण प्रस्तावास संमती येईपर्यंत प्रारंभी प्राप्त झालेल्या सर्वेक्षण क्रमांकाच्या मोजणीचे पैसे भरण्याची कार्यवाही केलेली नव्हती, तसेच सद्य:स्थितीत नगरपंचायत कोरोनाच्या अनुषंगाने कामात व्यस्त असल्याने सदर कार्यवाहीकरता थोडा विलंब झाला.

२२ एप्रिलला सकाळी १०.४५ वाजल्यापासून नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिकार्‍यांच्या कक्षात मी शासकीय कर्तव्य बजावत होतो. दुपारी १२ वाजता नगरसेवक भोगटे माझ्या कक्षात आले आणि त्यांनी उपरोक्त सर्वेक्षण क्रमांकाचे सर्वेक्षण का करत नाही ? असे विचारले. त्या वेळी भोगटे यांना संबंधित सर्वेक्षण क्रमांकासह त्याच्या लगतच्या क्रमांकाच्या मोजणीसाठी फेरप्रस्ताव सादर करणार आहोत. केवळ एका संमती मिळालेल्या सर्वेक्षण क्रमांकाची मोजणी केल्यास काही गटधारकांना जाणीवपूर्वक लक्ष केल्यासारखे होईल; म्हणून सर्व २० ते २५ सर्वेक्षण क्रमांकांचे फेरप्रस्ताव पाठवून पुढील कार्यवाही करूया, असे समजावून सांगितले. त्या वेळी भोगटे यांनी मला अपशब्द वापरून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असतांना भोगटे यांनी अडवले, असे गाढवे यांनी तक्रारीत म्हटले आहे.