सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांच्या वाढत्या संख्येमुळे अंत्यसंस्कार करण्यात मर्यादा येण्याची शक्यता

जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना

सिंधुदुर्ग – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण वाढल्याने अशा व्यक्तींचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यासाठी आणि त्यानंतर या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सिंधुदुर्गनगरी प्राधीकरण क्षेत्रात जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्र राज्यासह देशात विविध ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत असलेले चित्र हळूहळू सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दिसेल कि काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गेल्या २१ दिवसांत जिल्ह्यात ४८ जणांचा मृत्यू झाला असून ३ सहस्र ५०० व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. मागील ५ ते ६ दिवसांपासून प्रतिदिन ५ ते ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे, तर २२ एप्रिल या दिवशी तब्बल १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वाट बघण्याची वेळ आली आहे.

एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी किमान ३ घंट्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे दिवसभरात ४ ते ५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. आता ही संख्या वाढल्याने दुसर्‍या दिवसापर्यंत वाट बघावी लागत आहे. गेल्या वर्षीपासून सिंधुदुर्गनगरी प्राधीकरण क्षेत्रात अंत्यसंस्कारासाठी विद्युत् दाहिनीची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ‘विद्युत् दाहिनीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा’, असे पत्र दिले होते; मात्र त्याला जिल्हा प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू पावणार्‍या रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील स्मशानभूमीत शेड उभारण्यात आली आहे. आता मृतांची संख्या वाढत असल्याने या स्मशानशेडच्या जवळ आणखी एक शेड उभारण्यात येत आहे. या शेडमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागेश आरोसकर यांना कंत्राटदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी ही सेवा विनामूल्य आहे. याविषयी काही अडचण असल्यास सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण, सिंधुदुर्गनगरी या शाखेतील संजय यादव, समन्वय अधिकारी, भ्रमणभाष क्रमांक ९६८९०२४८६४; ऋषिकेश पानगले, लिपीक, साहाय्यक समन्वय अधिकारी, भ्रमणभाष क्रमांक ९६२३९९७७५६ आणि ठेकेदार नागेश आरोसकर, भ्रमणभाष क्रमांक ९४०५६३१७०१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी कळवले आहे.