शासनाला ४०० रुपये, तर खासगी रुग्णालयाला ६०० रुपये कोविशिल्ड लस देणार ! – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

मुंबई – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे सिद्ध करण्यात आलेल्या कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ या लसीचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. राज्यशासनासाठी प्रती लस रुपये ४००, तर खासगी रुग्णालयांसाठी प्रती लस रुपये ६०० असेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना अदर पूनावाला म्हणाले, ‘‘एकूण लसीच्या उत्पादनाचा ५० टक्के भाग केंद्रशासनाच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे. उर्वरित भाग राज्यशासन आणि खासगी रुग्णालये यांना दिला जाईल. पुढील २ मासांमध्ये आम्ही लसीचे उत्पादन वाढवणार आहोत. लसीची कमतरता भरून काढणार आहोत. पुढील ५ मासांत ‘कोविशिल्ड’ लस ‘रिटेल’ आणि ‘फ्री ट्रेड’ मध्ये कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असेल. सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे दर देशांतील अन्य लसींच्या तुलनेत न्यून आहेत. अमेरिकेत लसीचे मूल्य १ सहस्र ५००, रशिया आणि चीन येथे लसीचे मूल्य ७५० रुपये इतके आहे.’’