कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


कणकवली रेल्वेस्थानकावरील रॅपिड टेस्ट किटचा साठा संपला !

 कणकवली – येथील रेल्वेस्थानकावर येणार्‍या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याच्या उद्देशाने येथे आरोग्य विभागाचे पथक कार्यरत आहे; मात्र या पथकाकडील रॅपिड टेस्ट किटचा साठा संपल्याने रेल्वेने आलेले अनेक प्रवासी २० एप्रिलला तपासणी न करताच घरी गेल्याचे समजते. याविषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी सांगितले की, रॅपिड टेस्ट किटची जिल्हास्तरावर मागणी करण्यात आली असून किट उपलब्ध होईपर्यंत रेल्वेने येणार्‍या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे तपासणी करण्यासाठी शहरातील पटवर्धन चौकातील आरोग्य पथकाकडील २५ किट रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली नसेल, त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले.

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या गर्तेत !

वेंगुर्ले – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी २० एप्रिलला येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी ‘वर्ष २०१४ पासून रुग्णालयात कायमस्वरूपी आधुनिक वैद्य नाही. या समस्येविषयी पाठपुरावा केल्यास थातुरमातूर उत्तरे दिली जात आहेत. शहरातील कोविड केअर सेंटर ग्रामीण रुग्णालयापासून ३ कि.मी. लांब आहे. ‘१०८ रुग्णवाहिका’ व्यवस्थापनाला संपर्क होत नाही. संपर्क झालाच, तर तात्काळ कार्यवाही होत नाही. उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण आहे; परंतु अन्य कामे न झाल्याने कोविड केअर सेंटरसाठी ती वापरता येत नाही’, आदी सूत्रे मांडली. या वेळी अध्यक्षा सौ. सावंत यांनी ‘तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांची एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढू’, असे आश्‍वासन दिले.

रुग्णवाहिकेअभावी सावंतवाडीत सकारात्मक (पॉझिटिव्ह) अहवाल आलेली व्यक्ती २ घंटे ताटकळत !

सावंतवाडी – सावंतवाडी शहरात चिटणीस नाका येथे केल्या जात असलेल्या रॅपिड टेस्टमध्ये एका नागरिकाचा कोराना अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला. त्यानंतर त्याला कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने त्याला २ घंटे तेथेच ताटकळत रहावे लागले. अखेर रुग्णवाहिका न आल्याने दुचाकीवरून त्या व्यक्तीला कोरोना केअर सेंटरमध्ये नेण्यात आले.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]