केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात येणार्‍या १०० रुग्णालयांमध्ये सांगलीचा समावेश करावा ! – शिवसेनेचे निवेदन

आमदार सुरेश खाडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना जितेंद्र शहा (खाडे यांच्या शेजारी), तसेच अन्य

सांगली, २० एप्रिल – केंद्र सरकारने संपूर्ण भारतभर सांसर्गिक रुग्णालय उभारणार असल्याचे घोषित केले आहे. त्याअनुषंगाने या रुग्णालयांमध्ये सांगलीचा समावेश करावा, असे निवेदन शिवसेनेचे जितेंद्र शहा यांच्या नेतृत्वाखाली मिरज मतदारसंघातील भाजप आमदार सुरेश खाडे यांना देण्यात आले. या वेळी अनिल शेटे, पंडितराव बोराडे, प्रसाद रिसवडे, लक्ष्मण वडर, प्रकाश लवटे, सुशांत मधाळे, सुरेश सपकाळ इत्यादी उपस्थित होते. सदरचे निवेदन पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री यांनाही पाठवण्यात आले आहे.

आमदार खाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली-मिरज परिसरात हवामान इतके चांगले आहे की, या ठिकाणी कोणताही रोगी हा देशातल्या इतर हवामानाच्या तुलनेत ५० ते ७० टक्के अधिक लवकर बरा होतो. त्या अनुषंगाने याठिकाणी केंद्र सरकारने तात्काळ ५ सहस्र खाटांचे संसर्गित रुग्णालय स्थापन करावे. याचा लाभ परिसरातील ८ ते १० जिल्हे आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांना होणार आहे. तरी केंद्र सरकारने सांगलीसाठी सदरचे रुग्णालय तात्काळ संमत करावे.