‘सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.प. श्रीधरस्वामी यांनी दिलेल्या दृष्टांतानुसार ‘श्रीराम नामजप अनुष्ठान’ करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

प.प. भगवान श्रीधरस्वामी

आगामी भीषण आपत्काळात ‘सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.प. श्रीधरस्वामी यांनी प.पू. दास महाराज यांना दृष्टांत देऊन तेरा लक्ष ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा त्रयोक्षरी नामजप करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे १.३.२०२१ ते २७.३.२०२१ या कालावधीत भारतभरातील सनातन संस्थेच्या साधकांनी आपापल्या ठिकाणी यथाशक्ती ‘श्रीराम नामजप अनुष्ठान’ केले. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प.पू. दास महाराज

१. कोल्हापूर सेवाकेंद्रातील संत आणि साधक

१ अ. (पू.) श्री. सदाशिव (भाऊ) परब, कोल्हापूर सेवाकेंद्र

१ अ १. नामजप करतांना उत्साह, चैतन्य आणि आनंद मिळणे : परात्पर गुरु डॉक्टर गुरुमाऊलींना अपेक्षित असा नामजप होण्यासाठी मी सोवळे नेसून आणि सांगितलेले पथ्य पाळून केला. हा जप करतांना ‘गुरुमाऊलींच्या रूपात प्रत्यक्ष श्रीराम माझ्यासमोर पाठीला बाणांचा भाता आणि हातात धनुष्य घेऊन सिंहासनावर बसलेले आहेत’, असा भाव ठेवून अन् त्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊन मी थोड्या मोठ्या आवाजात नामजप करत होतो. त्या वेळी मला उत्साह, चैतन्य आणि आनंद मिळत असे. या वेळी ‘जणु गुरुमाऊलींनी मला त्रेतायुगात नेले आहे आणि त्यांच्या चरण कमलांवर नतमस्तक होऊन मी नामजप करत आहे’, असे मला वाटत होते.

१ अ २. समोर बसलेले साधक मारुतीरायांची रूपे भासणे आणि नामजपातून मिळालेल्या चैतन्यामुळे संपूर्ण दिवस उत्साहात अन् आनंदात सेवा होणे : हा नामजप करतांना मला माझ्यासमोर बसलेले साधक ही मारुतीरायांची रूपे भासत होती. माझ्यासमोर बसलेल्या साधकांच्या शेजारी आसंदीवर दास्यभावाने मारुतिराया ध्यानस्थ बसलेले जाणवायचे. या भावस्थितीत ‘कधी एक घंटा जप झाला’, याचे भानही रहात नव्हते. ध्यानमंदिरात सगळीकडे लख्ख प्रकाश पडून चैतन्यच चैतन्य जाणवायचे. तसेच संपूर्ण दिवस उत्साहात आणि आनंदात ग्रंथ तपासणीची सेवा पूर्ण होत असे.

१ अ ३. हलाहल प्राशन केल्यावर होणारा शरिराचा दाह अल्प होण्यासाठी भगवान शंकराने रामाचा जप करणे : सत्ययुगात भगवान शिवाने हलाहल प्राशन केल्यावर त्याच्या शरिरात दाह निर्माण झाला आणि तो अल्प करण्यासाठी ‘श्रीराम राम दाशरथी सीताराम’, हा नामजप महादेवाने चालू केला. हा जप भगवान शंकराच्या मुखी सतत असायचा. यानंतर त्याच्या शरिरातील दाह अल्प होऊन त्याला शांत वाटले. इतकी शक्ती ही ‘श्रीराम राम दाशरथी सीताराम’ या नामात आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आपणच ही अनुभूती देऊन लिहून घेतल्याविषयी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

१ आ. सौ. उमा गोरे देशमुख

१ आ १. ‘मारुतिराया ‘जय श्रीराम’ म्हणत सर्व साधकांना आशीर्वाद देत आहे’, असे जाणवणे : ‘या जपाच्या कालावधीत पुष्कळ आनंद मिळाला. नामजप करतांना वारंवार परात्पर गुरु डॉक्टरांची प्रभु रामचंद्र यांच्या वेशातील मूर्ती समोर यायची आणि आपोआप मानस साष्टांग नमस्कार घातला जायचा. जप चालू केल्यावर ‘मारुतिराया ‘जय श्रीराम’ म्हणत समोर येऊन बसला आहे आणि सर्व साधकांना आशीर्वाद देत आहे’, असे जाणवायचे. गुरुदेवांनी हा नामजप करण्याची संधी दिली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. श्री. रमाकांत दाभाडकर (वय ८५ वर्षे), यवतमाळ

२ अ. अनुभूती

१. एरव्ही माझी पाठ, कंबर आणि मान पुष्कळ दुखते; परंतु नामजपाला बसल्यावर दुखणे बंद होते.

२. मला सकाळी कधीच ढेकरा येत नाहीत; पण श्रीरामाचा नामजप करतांना मला ४ – ५ ढेकरा येऊन मला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे जाणवले.

३. १०.३.२०२१ या दिवशी नामजपाच्या वेळी अनुमाने सकाळी १० वाजता ‘देवघराचे दार उघडले गेले’, असे वाटले; म्हणून मी बाहेर पाहिले. तेथे वानर देवघराच्या पायरीवर बसून नामजप ऐकत असल्याचे जाणवले.

४. १२.३.२०२१ या दिवशी मला माझ्या मित्राचा भ्रमणभाष आला. तो म्हणाला, ‘‘मी सकाळी येऊन गेलो. हळू आवाजात २ – ३ शब्दही बोललो; पण तू नामजप करण्यात दंग होतास.’’ मित्राचे बोलणे ऐकून माझा भाव जागृत झाला आणि मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

५. नामजप १ घंट्यात १० माळा या गतीने आणि एका लयीत होत होता.

२ आ. नाम भावपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न : नामजप भावपूर्ण होण्यासाठी मी विविध भावप्रयोग केले.

१. प.पू. दास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हनुमंत नामजप ऐकायला आला आहे आणि तो श्रीरामाच्या चरणांजवळ बसला आहे.

२. नामजप हृदयातून बाहेर येत आहे आणि संपूर्ण शरीरभर पसरत आहे.

३. शरिराभोवती श्रीरामाच्या नामाचे वलय सिद्ध होत आहे.

४. माळेच्या प्रत्येक मण्यावर प्रभु श्रीरामाचे मुख आणि चरण दिसत आहे.

‘हे श्रीरामराया, गुरुदेवा, आपणच माझ्याकडून भावपूर्ण नामजप करवून घेऊन अनुभूती देत आहात’, त्यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ (१.४.२०२१)

३. मुंबई

अ. ‘श्रीराम, मारुति, दत्त, प.प. श्रीधर स्वामी आणि परात्पर गुरु डॉक्टर सर्वजण एका ओळीत उभे असून त्या सर्वांचे चरण दिसत होते.’

– श्री. पांडुरंग दुदुंमकर

आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीरामाच्या रूपात दिसत होते. मारुतिराया नामजप ऐकण्यासाठी त्यांच्या चरणांशी बसून असल्याचे दिसले. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती झाली.

– सौ. वनमाला वैती

इ. ‘हृदयामध्ये परात्पर गुरु डॉक्टर श्रीरामाच्या रूपात दिसत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मारुतीराया बसले आहेत आणि सर्व देवीदेवता त्यांच्या चरणी फुले वहात आहेत’, असे दिसत होते. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती.

ई. अयोध्येत प.पू. भक्तराज महाराज दिसत होते. प.पू. दास महाराज हनुमंताच्या वेशात दिसत होते. श्रीराम मंदिराच्या बाजूला श्रीरामाचे दर्शन झाले आणि कृष्णतुळस दिसली.

उ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांतून चैतन्याचे गोळे बाहेर निघून संपूर्ण पृ्थ्वीवर पसरत आहेत आणि श्री दुर्गादेवीचे चैतन्य एकेकाला भारीत करत आहे’, असे जाणवत होते.

– सुनीता कोळी

ऊ. ‘नामजप करतांना प्रारंभी धुक्यासारखे अस्पष्ट दिसत होते. नामजप केल्यानंतर स्पष्ट दिसू लागले आणि शेवटी केवड्याचा सुगंध आला.’ – श्री. प्रकाश सागवेकर

ए. ‘गुरुमाऊलीच्या कृपेने जप होत आहे’, असे जाणवत होते. प.पू. दास महाराज मारुतीच्या रूपात दिसत होते. – श्रीमती पुष्पलता नेसवणकर

ऐ. ‘परात्पर गुरु डॉक्टर रामरूपात ध्यानाला बसले आहेत. सर्व ठिकाणी चैतन्य पसरत आहे. ‘रामराज्यात सर्व मोक्षाला गेले आहेत’, असे दिसत होते.’ – सौ. आशा कदम

४. रायगड

अ. नामजप करतांना सर्व विचार बंद होऊन शून्यावस्था जाणवत होती. ‘आता काही करायला नको, शांत बसून राहूया’, असे वाटत होते.’

– श्री. विजय वर्तक

५. ‘श्रीरामजप अनुष्ठाना’च्या वेळी श्रीरामाचा नामजप करतांना रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

५ अ. झालेले त्रास

१. ‘जपाच्या वेळी पहिले २ – ४ दिवस मला ग्लानी येत होती आणि आवाजात पालट होत होता.’ – सौ. वैशाली राजहंस

२. ‘नामजप करतांना माझा आवाज बसत होता आणि मला खोकला येत होता.’ – सौ. अनुपमा जोशी

३. ‘दिवसभरात काही वेळा आम्हाला थकवा जाणवत होता.’ – सौ. वैशाली राजहंस आणि सौ. अनुपमा जोशी

५ आ. आलेल्या अनुभूती

१. ‘रामनामाचा जप करतांना पुष्कळ आनंद मिळत होता आणि उत्साह वाटत होता. ‘जप संपूच नये’, असे वाटत होते.’ – सौ. वैशाली राजहंस आणि सौ. अनुपमा जोशी

२. ‘नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीरामाच्या वेशात आणि आशीर्वादाच्या मुद्रेत दिसत होते. मी त्यांच्या चरणी सूक्ष्मातून तुळशीपत्र वहात असतांना त्याचा सुगंध आला.

३. मला प.प. श्रीधरस्वामींचे दर्शन झाले.’

– सौ. वैशाली राजहंस

४. ‘जपाच्या वेळी मला २ वेळा परात्पर गुरु डॉक्टर आणि ३ – ४ वेळा प.प. श्रीधरस्वामी यांचे दर्शन झाले.

५. मला श्रीरामाचे कुटुंब आणि श्री रेणुकामातेचे मुख दिसले.’- सौ. अनुपमा जोशी

६. ‘आम्हा दोघींचा श्रीरामाचा जप दिवसा किंवा रात्री केव्हाही चालू होतो. त्यातून आम्हाला पुष्कळ आनंद मिळतो. दुसरा कोणताही जप करतांना हा जप आपोआप चालू होतो.’ – सौ. वैशाली राजहंस आणि सौ. अनुपमा जोशी (२८.३.२०२१)

पू. सदाशिव (भाऊ) परब ‘श्रीराम नामजप अनुष्ठाना’साठी श्रीरामाचा नामजप करत असतांना कोल्हापूर सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती

पू. सदाशिव परब

पू. सदाशिव (भाऊ) परब श्रीरामाचा नामजप करत असतांना कोल्हापूर येथील सेवाकेंद्रातील काही साधक त्यांचा वैयक्तिक नामजप करत असत. त्या वेळी साधकाला जाणवलेले सूत्र आणि साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. जाणवलेले सूत्र

अ. ‘हा जप करत असतांना पू. काकांच्या तोंडवळ्यावर अवर्णनीय आनंद जाणवत असे.’ – श्री. अजय केळकर

२. अनुभूती

अ. ‘इतर वेळी नामजप करतांना ग्लानी आल्यासारखे होते; मात्र पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या समवेत नामजप करतांना चैतन्य जाणवत होते आणि आनंद मिळत होता.’ – श्री. हेमंत सातपुते आणि सौ. अरुणा पवार

आ. ‘पू. काकांसमवेत नामजप करतांना ‘मन आणि बुद्धी यांवरील आवरण अल्प होऊन मन हलके होत असे अन् नंतर ‘सेवा करण्यासाठी उत्साह आणि मनाची सकारात्मकता वाढत आहे’, असे जाणवायचे.’ – श्री. गोविंद दर्डे

इ. ‘पू. काका हा नामजप करतांना ‘त्यांच्याकडून शक्तीची वलये बाहेर पडत आहेत आणि ती सर्वदूर जात आहेत’, असे जाणवले. हा जप करतांना ध्यान लागल्यासारखे होऊन जप झाल्यावर एकदम उत्साही जाणवून ‘जप संपूच नये’, असे वाटत असे.’

– श्री. अजय केळकर

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक