महाराष्ट्र शासनाकडून ६ राज्यांना संवेदनशील घोषित

अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांना १५ दिवसांचे गृहविलगीकरण बंधनकारक

मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक दी चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, देहली आणि उत्तराखंड या ६ राज्यांना महाराष्ट्र शासनाने संवेदनशील घोषित केले आहे. अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांसाठी १५ दिवस गृहविलगीकरणात रहाणेही बंधनकारक करण्यात आले आहे. लांब पल्ल्याचा रेल्वेप्रवास करणार्‍यांसाठी शासनाने कार्यप्रणालीही घोषित केली आहे. लक्षणे नसलेल्या किंवा विलगीकरण केंद्रात पाठवण्याची आवश्यकता नसलेल्या प्रवाशांना १५ दिवस गृहविलगीकरणात रहाणे बंधनकारक आहे. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ किंवा ‘अ‍ॅन्टीजेन’ चाचणी नकारात्मक असली, तरी प्रवाशांना १५ दिवस गृहविलगीकरण बंधनकारक असेल. प्रवाशांच्या हातावर शिक्का मारण्यात येईल. संवेदनशील ठिकाणाहून येणार्‍यांनी प्रवासाच्या ४८ घंटे आधी ‘आर्टीपीसीआर्’ चाचणी करणे अनिवार्य आहे.

१. ‘थर्मल स्कॅनिंग’साठी गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांनी गाडीच्या पूर्वी पुरेसा कालावधी रेल्वेस्थानकावर उपस्थित रहावे.

२. कोरोनाविषयक लक्षणे नसल्यासच महाराष्ट्रात येता येईल.

३. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी नकारात्मक असल्यास  ‘थर्मल’ किंवा कोरोनाची लक्षणे नसल्याची पडताळणी करणार.