कु. चैत्राली कुलकर्णी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. प्रेमभाव : ‘कु. चैत्राली प्रेमळ आहे. घरातील कुणी आजारी असेल, तर ती त्यांची प्रेमाने काळजी घेते आणि प्रतिदिन त्यांची विचारपूस करते. ती त्यांना उपायांसाठी नामजपही शोधून देते.
२. साधनेची तीव्र तळमळ
२ अ. ‘आज्ञापालन’ हा गुण असल्याने साधनेचे सर्व प्रयत्न भावाच्या स्तरावर करणे : चैत्रालीमध्ये ‘आज्ञापालन’ हा गुण उपजतच आहे. तिला साधनेचे जे प्रयत्न करायला सांगितले जातात, ते ती गांभीर्याने करते आणि आम्हालाही त्याची जाणीव करून देते. ती प्रत्येक सत्संग ऐकते आणि त्यात सांगितल्यानुसार कृतीच्या अन् भावाच्या स्तरावर प्रयत्न करते.
२ आ. चैत्रालीने साधनेचे ध्येय घेऊन स्वतःच्या आवडी निवडी न्यून करणे : वर्ष २०२० पासून चैत्रालीने साधनेचे ध्येय घेतले आणि सर्वांत प्रथम स्वतःच्या आवडी निवडी न्यून केल्या, उदा. खाण्या-पिण्याच्या सवयी, कपड्यांची आवड. ती साधा आणि सात्त्विक आहार घेते. बाहेरचे काही खाण्यासाठी आणले, तर तिला ते आवडत नाही. ‘मला घरातच खाऊ बनवून दे’, असे ती सांगते.
२ इ. चुकांविषयी संवेदनशील असणे आणि साधनेचे गांभीर्य असल्याने व्यष्टी साधनेचा आढावा न कंटाळता देणे : चैत्राली चुकांविषयी अतिशय संवेदनशील आहे. ती गांभीर्याने सारणी लिखाण करते आणि स्वयंसूचना सत्रेही प्रामाणिकपणे करते. ती तिच्याकडून झालेल्या चुकांसाठी प्रायश्चित घेते. आपल्यामुळे इतरांना त्रास झाल्यास तिला खंत वाटून ती क्षमा मागते. ती प्रतिदिन न कंटाळता आनंदाने व्यष्टी साधनेचा आढावा देते. साधनेचे सर्व प्रयत्न ‘प.पू. गुरुदेवच माझ्याकडून करवून घेत आहेत’, असा तिचा भाव असतो.
३. पुढाकार घेऊन सेवा करणे : तिने भ्रमणभाषवर ऑनलाईन सेवा शिकून घेतली आहे. ती प्रत्येक सेवा पुढाकार घेऊन आणि भावपूर्ण रितीने करण्याचा प्रयत्न करते. आता तिची प्रसारसेवा काही प्रमाणात चालू झाली आहे. ती आम्हा दोघांसोबत सेवेला येते.
४. घराचा आश्रम बनण्यासाठी प्रयत्न करणारी चैत्राली ! : प.पू. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे सध्या ती घराचा आश्रम करण्याचा प्रयत्न करत आहेे. साधकांच्या घरी जाऊन सेवा करतांना ‘आश्रमातच सेवा करत आहे’, असा भाव ती ठेवते.
५. प.पू. गुरुदेवांच्या भावविश्वात रमण्याचा प्रयत्न करणे : ती प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांची दर्शनपुस्तिका पहाते. ती सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाते. गुरुदेवांजवळ जाण्याची तिला पुष्कळ ओढ लागली आहे. प्रत्येक कृती करतांना ती प.पू. गुरुदेवांना जोडून करण्याचा प्रयत्न करते. गुरुदेवांच्या भावविश्वात रमण्याचा ती प्रयत्न करते.
६. चैत्राली नेहमी म्हणते, ‘‘आई, मला सद्गुरु स्वातीताईंसारखे ‘समष्टी संत’ व्हायचे आहे.’’
७. कु. चैत्रालीमधील स्वभावदोष : चालढकलपणा, अव्यवस्थितपणा आणि स्पष्टीकरण देणे.
‘हे गुरुदेवा, तुम्ही आम्हाला दैवी गुण असलेली बालसाधिका सांभाळण्यास दिलीत, त्यासाठी कोटीशः कृतज्ञता ! तिच्यासारखी साधनेची तळमळ आणि गुण आमच्यातही येऊ देत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. अनघा आणि श्री. प्रसाद कुलकर्णी (कु. चैत्रालीचे आई-वडील), पुणे
व्यष्टी आणि समष्टी सेवेचे प्रयत्न तळमळीने करणारी अन् एकाग्रतेने सेवा करणारी कु. चैत्राली प्रसाद कुलकर्णी ! : ‘मार्च २०२० पासून दळणवळण बंदी झाल्यापासून कु. चैत्राली व्यष्टी आणि समष्टी सेवेचे प्रयत्न तळमळीने करत आहे. तिने अल्प कालावधीमध्ये ऑनलाईन सत्संग आणि प्रवचन यांचे ‘होस्टिंग’ करणे, तसेच शौर्यजागृती व्याख्यानाचे सूत्रसंचालन करणे, बातमी बनवणे इत्यादी सेवा शिकून घेतल्या. त्यानुसार आता ती सेवा करत आहे. ती अंतर्मुख राहून एकाग्रतेने सेवा करते. ती आश्रमात खाऊ पाठवण्याच्या सेवेतही साहाय्य करते.’ – सौ. प्रतिभा फलफले, पुणे
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना कु. चैत्रालीला सुचलेली कविता !
मज सदा वाटते, हे ‘चैत्राली’ नामक फूल केवळ गुरुचरणीच रहावे ।
कधी वाटे मज फुलपाखरू बनून गुरुदेवांच्या हातावर बसावे ।
अन् गुरुदेवांच्या खोलीत आनंदाने बागडावे ॥ १ ॥
कधी वाटते, ससा होऊनी गुरुचरणांशी जावे ।
गुरुदेवांची प्रीती प्रत्यक्षात अनुभवून धन्य धन्य व्हावे ॥ २ ॥
कधी वाटते, खंड्या पक्षी बनून गुरुदेवांच्या ओंजळीत बसावे ।
अन् गुरुदेवांना अखंड न्याहाळावे ॥ ३ ॥
कधी वाटते, गुरुदेवांच्या खोलीतील पायपोस व्हावे ।
अन् गुरुचरणांचा स्पर्श सतत अनुभवावा ॥ ४ ॥
कधी वाटते, लहान होऊन गुरुदेवांच्या चरणांजवळ बसावे ।
गुरुदेवांचे वात्सल्य अनुभवून आनंदविभोर व्हावे ॥ ५ ॥
कधी वाटते, गुरुदेवांच्या पादुकांना मस्तकी घ्यावे ।
अन् सर्वत्र गुरुदेवांचे चैतन्य पसरवत आनंदाने बागडावे ॥ ६ ॥
कधी वाटते, फूल बनून, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या ओंजळीत बसून गुरुचरणी अर्पण व्हावे ।
अन् हे ‘चैत्राली’ नामक फूल केवळ गुरुचरणीच रहावे ॥ ७ ॥
गुरुदेवांचे आनंदी फूल,
– कु. चैत्राली प्रसाद कुलकर्णी, पुणे (मे २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |