पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य संस्थांमधील वापरात नसलेले; परंतु वापरण्यायोग्य असलेले व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना देण्यास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अनुमती दिली आहे. यामुळे गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयातील ‘व्हेंटिलेटर बेड’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सरकारी आरोग्य संस्थांमधील ‘व्हेंटिलेटर बेड’ची मागणी अल्प होऊ शकेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे. ज्या खासगी आरोग्य संस्थांकडे ‘ऑक्सिजन बेड’, अतीदक्षता विभाग, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत अशा आरोग्य संस्थांनाच व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा आदेश आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व तालुका वैद्यकीय अधिकार्यांना दिला आहे. या व्हेंटिलेटरसाठी नाममात्र भाडे आकारण्यात येणार आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरला प्रतिदिन ५५० रुपये तर लोकसहभाग किंवा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरला प्रतिदिन १०० रुपये भाडे आकारले जाणार आहे.