गोव्यातील खाण घोटाळा : शासन ३०० कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी लवकरच आदेश काढणार

पणजी, १८ एप्रिल (वार्ता.) – शासनाचे खाण आणि भूगर्भशास्त्र खाते राज्यातील खाण घोटाळ्यावरून ३०० कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी लवकरच आदेश काढणार आहे. खाण घोटाळ्यावरून लेखा परीक्षकांच्या (चार्टर्ड अकांऊटंटच्या) गटाने दिलेल्या लेखा अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे.

उपलब्ध सूत्रानुसार खाण आणि भूगर्भशास्त्र खाते २१ एप्रिल या दिवशी वसुलीचा आदेश काढणार आहे. खाण घोटाळ्यामुळे शासनाला आणखी किती हानी झाली, याची पडताळणी करणे खाण खाते चालूच ठेवणार आहे. खाण घोटाळ्यावरील लेखा अहवालाच्या आधारावर शासनाने ऑक्टोबर २०२० मध्ये अंतिम सुनावणीला प्रारंभ केला. तत्पूर्वी खाण खात्याने ११८ खाण लीजधारिकांनी दिलेल्या उत्तरांची छाननी केली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ३ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यावरून खाण आस्थापनांना देण्यात आलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिसींवर निर्णय घेण्याचा आदेश शासनाला दिला होता.

‘गोवा फाऊंडेशन’ या पर्यावरणप्रेमी संघटनेने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला होता. ‘गोवा फाऊंडेशन’ने या जनहित याचिकेत म्हटले होते की, न्यायालयाने शासनाला खाण घोटाळ्यावरून संबंधित खाण आस्थापनांकडून ३ सहस्र ४३१ कोटी रुपये वसूल करण्याचा आदेश द्यावा. गोवा शासन वसुली करण्यास दिरंगाई करत असल्याने ही जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी खाण घोटाळ्यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करतांना खाण घोटाळ्याशी संबंधित वसुली करण्यास शासनाला गेली ९ वर्षे अपयश आल्याचा आरोप केला होता.