नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र !
नागपूर – महाराष्ट्रातील विदर्भ आणि नागपूर येथे कोरोनाच्या जागतिक महामारीने कहर केला आहे. कोरोनावरील उपचारांमध्ये ‘रेमडेसिविर’ हे इंजेक्शन रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक आहे. आवश्यक औषधांमध्ये याचा समावेश असून सामान्य लोकांना त्याची टंचाई भासत आहे, तसेच काळ्या बाजाराचाही फटका बसत असून या इंजेक्शनचे मूल्य निर्धारित करावे, अशी विनंती येथील महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना १० एप्रिल या दिवशी पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी या पत्रात म्हटले आहे की,
१. ‘रेमडेसिविर’ औषधाची किंमत सध्या १ सहस्र ३०० रुपयांच्या आसपास आहे. टंचाईमुळे काळ्या बाजारात ते ५-७ सहस्र रुपयांना विकत घ्यावे लागते. या इंजेक्शनची किंमत ‘डीपीसीओ’ अंतर्गत निर्धारित करण्यात आली, तर सामान्य लोकांना इंजेक्शन सहज आणि सुलभ उपलब्ध होईल. त्यांच्यावर आर्थिक बोजाही पडणार नाही.
२. सध्या कोरोनावर केल्या जाणार्या औषधोपचाराचे मूल्य ४ सहस्रांहून अधिक आहे. यात ८०० ते ९०० रुपयांची औषधेही उपलब्ध आहेत. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी सर्वसामान्य रुग्णांचा विचार करून अल्प किंमतीची औषधे लिहून द्यावीत आणि सामान्यांना कोविड काळात दिलासा द्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले.
९ एप्रिल या दिवशी महापौरांनी दूरभाषवर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा करून ‘रेमडेसिविर’ची किंमत निर्धारित करण्याच्या कार्यवाहीची सूचना केली आहे.