जगभरात कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या वर्षी काही मास दळणवळण बंदी होती. याचे परिणाम वेगवेगळ्या स्तरांवर झालेले दिसत आहेत. यामध्ये कौटुंबिक कलह आणि त्यातून घटस्फोट होणे, ही गंभीर समस्याही समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात मागील वर्षभरात घटस्फोट मिळवण्यासाठी १ सहस्र १९२ खटलेे प्रविष्ट झाले. त्यापैकी १ सहस्र ४ खटल्यांमध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यात आले. एका न्यायालयातील ही आकडेवारी बघून या समस्येची भीषणता लक्षात येते. या पार्श्वभूमीवर ‘द फॅमिली कोर्ट असोसिएशन’च्या अध्यक्षा अधिवक्त्या वैशाली चांदणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘दळणवळण बंदीत अनेकांच्या नोकर्या गेल्या, वेतनकपात झाली. अशा परिस्थितीत दांपत्यातील वाद वाढले. अगदी किरकोळ वादातून घटस्फोट मिळवण्याची प्रकरणे वाढली.’’ येथे ‘अगदी किरकोळ वाद’ हा शब्द अधोरेखित करण्यासारखा आहे. घटस्फोटासाठी अर्ज करणार्यांमध्ये मुख्यत्वे सुशिक्षित आणि नोकरदार आहेत. दळणवळण बंदीच्या काळात अनेक नोकरदार महिलांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यासह घरातील कामेही करावी लागली. या काळात आर्थिक चिंता, कामाचा अतिरिक्त भार, सामाजिक अस्थैर्य या सर्वांमुळे नागरिकांच्या मनाची पुष्कळ ओढाताण झाली.
सध्या पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे व्यक्ती उथळ विचाराने निर्णय घेऊन मोकळी होते. जीवनात प्रत्येकाला समस्या येतात. त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक, तसेच परस्पर सहकार्याची भावना असेल, तर त्यातूनही मार्ग काढता येतो. हे साध्य करण्यासाठी व्यक्तीची सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता राज्य पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर उभे आहे. या कठीण परिस्थितीत स्वत:चे मनोबल टिकवून कुटुंबातील सदस्यांना समजून घेणे, त्यांना सावरणे हे आव्हान प्रत्येकापुढे आहे. हे साधण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव उपाय आहे. देवाला श्रद्धापूर्वक प्रार्थना करणे, नामजप करणे यांमुळे मनाची सकारात्मक शक्ती वाढते, तसेच विवेकबुद्धीही जागृत होते. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने साधनेला आरंभ केल्यासच तिचे लाभ अनुभवता येतील. त्यामुळे या कठीण काळाला सामोरे जाण्यासह कुटुंबव्यवस्था टिकण्यासाठी साधना अपरिहार्य आहे, हेच खरे !
– वैद्या (कु.) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल.