कुंपणानेच शेत खाल्ल्यास तक्रार कुणाकडे करायची ? भ्रष्ट न्यायाधीश असतील तर जनतेला न्याय मिळेल का ? अशा न्यायाधीशांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
पुणे – न्यायालयात चालू असलेल्या भूमीविषयीच्या खटल्याची माहिती महिलेला देऊन निकाल बाजूने लावण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच न्यायाधिशाने स्वीकारली. या प्रकरणातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांची पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. लाच स्वीकारणारी महिला विभावरी भालचंद्र (वय २९ वर्षे), सुशांत केंजळे (वय ३५) आणि बडतर्फ पोलीस निरीक्षक भानुदास उपाख्य अनिल जाधव (रहाणार मुंबई) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जतकर यांनी तक्रारदारांकडून काही रक्कम स्वीकारली का ? या प्रश्नाला, तसेच त्यांच्या दुसरा क्रमांक असलेल्या भ्रमणभाष संदर्भात त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही, असे सरकार पक्षाच्या वतीने विलास घोगरे पाटील यांनी न्यायालयास सांगितले. विशेष न्यायाधीश एस्.आर्. नावंदर यांनी त्यांना २५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि पोलिसांना अन्वेषणात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन दिला.