सांगली, २९ मार्च (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग परत वाढत आहे. जानेवारी, फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च मासात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ३० मार्चपासून कोरोनाविषयीच्या नियमांची कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. आस्थापनांना रात्री ८ पर्यंतच खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली असून नियम मोडणारी आस्थापने ‘सील’ करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे गृह अलगीकरणात असूनही जे नागरिक बाहेर फिरतांना दिसतील, त्यांच्यावरही आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत गुन्हे नोंद केले जातील, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी २९ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
आयुक्त पुढे म्हणाले की,
१. कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली, तरी महापालिका क्षेत्रात मृत्यूदर अत्यल्प आहे. जानेवारी मासात २.२ टक्के, फेब्रुवारी मासात ०.९९ टक्के आणि मार्च मासात तो केवळ ०.८६ टक्के इतका अल्प आहे.
२. महापालिका क्षेत्रात लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असून ६० वर्षांवरील २५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून ४५ ते ५९ वयाच्या नागरिकांचे २३ टक्के लसीकरण झाले आहे. महापालिका क्षेत्रात २९ ठिकाणी लसीकरण करण्यात येत असून यात १३ खासगी ठिकाणी हे लसीकरण करण्यात येत आहे.
३. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेने १०० खाटांचे रुग्णालय सिद्ध केले असून लवकरच आणखी १०० खाटांचे रुग्णालय सिद्ध होत आहे. सामान्यांना कोरोनाबाधित झाल्यावर उपचार घेणे सोपे व्हावे म्हणून ज्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे, त्या रुग्णालयांच्या बाहेर फलक लावण्यात येणार आहेत. या रुग्णालयांसाठी एक समन्वयक नेमण्यात येणार असून त्यांचा क्रमांकही घोषित करण्यात येणार आहे. ज्यांना तक्रार करायची आहे, ते त्या क्रमांकावर तक्रार करू शकतात. गतवर्षी अधिक देयक घेतल्याच्या ज्या ज्या रुग्णालयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि ज्यांनी अधिक रक्कम घेतल्याचे आढळून आले, त्या त्या रुग्णालयांनी अधिकची रक्कम संबंधित रुग्णालयांना परत केली आहे.
या योजनेत रुग्णाच्या उपचारांचे सर्वच देयक हे शासन देत नसून त्यातील ज्या ज्या योजनांसाठी आहे, तेवढीच रक्कम संबंधितांना मिळते.
४. गतवर्षी जसे ऑगस्ट-सप्टेंबर मासात कोरोनाची उच्चांकी रुग्णसंख्या झाली होती, तशीच यंदाही होऊ शकते; मात्र त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. यंदा आपण गृह विलगीकरणार अधिक भर देत असून सध्या २०० पेक्षा अधिक नागरिक गृह अलगीकरणात आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही नागरिकांना गांभीर्य नाही ! – आयुक्त
कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. दंड आकारणी केल्यानंतरही ‘मास्क’ लावले जात नाहीत. गृह अलगीकरणात असलेले काही नागरिक बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्वांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.