पुणे – सत्तास्थानी असलेल्या पक्षाचा संसदेमध्ये एकही मुसलमान खासदार नाही. तसेच मुसलमान आणि इतर अल्पसंख्यांकांचे राजकीय स्थान अल्प करण्यात आले असल्यामुळे समाजाची हिंदूकरणाची प्रक्रिया वाढली आहे, असे फुत्कार भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी काढले. (मुसलमान खासदार आला म्हणजे अल्पसंख्यांकांचे राजकीय स्थान वाढणार आहे का ? – संपादक) ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’च्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुसलमान आदिवासी आणि अन्य घटकांना राजकीय व्यवस्थेतून बाजूला सारण्याचे सध्या प्रयत्न चालू आहेत. (आता आदिवासींमध्येही मुसलमान शोधणारे तज्ञ आहेत कि अज्ञानी ? हे जनतेने ठरवावे ! – संपादक) देशातील सर्व अल्पसंख्यांकांची संख्या ६५ टक्क्यांपर्यंत जाते. त्यामुळे अल्पसंख्यांक ठरणार्या समाजाच्या हक्कांचे रक्षण आवश्यक झाले आहे. हक्क आणि अधिकार यांविषयी दुजाभाव करणे म्हणजे देशाला हिंदु राष्ट्राकडे नेण्याचे प्रयत्न असून त्यामुळे देशाला धोका निर्माण झाला आहे. (अल्पसंख्यांकांची लोकसंख्या ६५ टक्क्यांपर्यंत जात असेल, तर त्यांना अल्पसंख्यांक का म्हणायचे ? देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदूच अल्पसंख्य आहेत; मात्र त्यांना अल्पसंख्यांकांच्या सवलती मिळत नाहीत. हा हिंदूंवरच एकप्रकारे अन्याय आहे ! – संपादक)
सध्या मुसलमानबहुल भागात सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत हे सर्व टाळण्यासाठी, तसेच अस्तित्व, हक्क आणि अधिकार यांसाठी अल्पसंख्यांकांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.