पुणे – भारत-इंग्लंड क्रिकेट सामना चालू असलेल्या एम्.सी.ए. मैदानालगतच असलेला बुकींचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. ही टोळी मैदान परिसरात होती. तिथे चालू असलेल्या सामन्याचे भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणीवर ६ ते १३ सेकंद विलंबाने प्रक्षेपण व्हायचे. याचा अपलाभ घेऊन ते सट्टा लावत असायचे. (क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ? – संपादक)
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला लागूनच असलेल्या घोरवडेश्वर डोंगर आणि बांधकाम चालू असलेल्या इमारतीत, तर पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सट्टाबाजार चालू होता. वाकड पोलिसांनी ३ पथके नेमून एकूण ३३ बुकींना अटक केली आहे, तसेच विदेशी नोटांसह ४५ लाखांचा मुद्देमालही जप्त केला. ही आंतरराज्यीय बुकींची टोळी असल्याचे निदर्शनास आले.गहूंजे येथील मैदान पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला लागून आहे. येथे मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा अशा ५ ते ६ राज्यांतील बुकी दाखल झाले.