पुणे – उचित मीडिया आयोजित सर्जनशील कट्टा या फेसबूकवरील कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर जाधव यांनी डॉ. श्रीपाल सबनीस यांची मुलाखत घेतली. वंचित आणि आदिवासी समाजासंदर्भात लेखन केल्याविषयी नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना शाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या मते शिवाजी महाराजांवरील इतिहासाचे ब्राह्मणीकरण आणि मराठाकरण झालेले असून ब्राह्मणांनी इतिहासाचे विकृतीकरण करून लिहिले आहे. (इतिहासाचार्य राजवाडे ते बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ग्रंथांना ते ब्राह्मणीकरण असे म्हणतात.)
‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते’, असे असत्य ब्राह्मणवादी इतिहासकारांच्या ग्रंथात दिसते, तर मराठाकरण झालेल्या इतिहासकारांच्या मते दादोजी कोंडदेव विजापूरचे हेर होते, गद्दार होते, असे जातीयवादी विचार मांडले असल्याचे ते दाखवून देतात. (याचे खंडण करतांना दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते याविषयी मात्र ते भाष्य करण्याचे टाळतात.)
महाराष्ट्र हा ‘वादमुक्त’ व्हावा या उद्देशाने त्यांनी ४२२ पानांचा शिवाजी महाराजांवरील ग्रंथ लिहिला असून या ग्रंथाला उदयनराजे भोसले, संभाजी महाराज यांनी गौरवणार्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणाही व्यक्तीने आपसात भांडू नये कारण विश्वनागरिक म्हणून जगायचे तर आपल्याला महाराजांचा आदर्श घ्यावा लागेल, असे त्यांनी मुलाखतीच्या वेळी सांगितले.
डॉ. सबनीस यांनी संदर्भ घेतलेल्या प्रत्येक ग्रंथाच्या लेखकाला त्यांचे पुस्तक पाठवले; परंतु कुणीही त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या नसल्याचे ते म्हणाले.