वीजदेयक थकवल्यामुळे सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीजजोडणी तोडली

सातारा, २२ मार्च (वार्ता.) – ८५ सहस्र रुपयांचे वीजदेयक थकवल्यामुळे सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीजजोडणी वीज वितरणच्या कर्मचार्‍यांनी तोडली. सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयावरील ही पहिलीच कारवाई आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे जिल्ह्याचे मुख्य कार्यालय आहे. नागरिक पासिंग, वाहन अनुज्ञप्ती, पुनर्पासिंग आदी कामांसाठी येथे येतात. कार्यालयातील ९० टक्क्यांहून अधिक कामे संगणकांवर केली जातात. वीजजोडणी तोडल्यामुळे कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले.