१. आपत्काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी विहीर किंवा आड (लहान विहीर) आताच खोदून घेणे आणि हे शक्य नसल्यास कूपनलिका (बोअर वेल) खोदून घ्या !
आपत्काळात अनेक दिवस वीज नसणे, अतीवृष्टीमुळे धरण फुटणे, तलावाच्या क्षेत्रात पुरेसा पाऊस न पडणे आदी कारणांमुळे नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद होऊ शकतो. अशा परिस्थितीत शासनाकडून काही वेळा ‘टँकर’द्वारे पाणीपुरवठा केला जातो; पण आपत्काळात इंधनाच्या अभावी ‘टँकर’ची वाहतूकही ठप्प होऊ शकते. दुष्काळात गावाजवळून वहाणारी नदीही आटण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या विविध समस्या लक्षात घेऊन जेथे पाणी लागू शकते, अशा ठिकाणी घराजवळ विहीर किंवा आड (विहीर) आणि हे शक्य नसेल, तर कूपनलिका आताच खोदून घ्यावी.
विहिरीवर हातरहाटही बसवून घ्यावा. हातरहाटाने पाणी काढण्याची सवय ठेवावी. रहाटासाठी अजून एखादी दोरी विकत घेऊन ठेवावी. विहिरीवर सौरऊर्जेवर चालणारा पंपही बसवून घ्यावा. विहिरीचे पाणी पावसाळा चालू होईपर्यंत पुरत नसल्यास जाणकाराला विचारून विहिरीची खोली वाढवून घ्यावी. विहीर आणि कूपनलिका यांतील पाणीसाठा मानवी चुकांमुळे दूषित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
२. आपत्काळात कुटुंबाला न्यूनतम (कमीतकमी) १० ते १५ दिवस पुरेल, एवढे पाणी साठवता येईल, अशी सोय करायला हवी.
३. विजेअभावी घरातील जलशुद्धीकरण-यंत्र (वॉटर प्युरिफायर) बंद पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील पर्यायांचा विचार करणे
अ. ‘कँडल फिल्टर’ खरेदी करून ठेवणे
आ. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करणे
इ. पाणी शुद्ध करणारी यंत्रणा असलेली बाटली (इन्स्टंट प्युरिफायर बॉटल) या बाटल्या ‘ऑनलाईन’ विकत मिळतात.
ई. मातीचा रांजण किंवा माठ घेऊन ठेवणे
उ. काचेची बाटली, कळशी किंवा पिंप यांच्याभोवती ओले कापड घट्ट गुंडाळावे. साधारणपणे ३ – ४ घंट्यांत आतील पाणी थंड होते. कापड वाळल्यावर ते पुन्हा ओले करावे.
ऊ. पावसाचे पाणी पिंपात साठवणे : पावसाळ्यात घराच्या छतावरून गळणार्या पाण्याखाली पिंप ठेवून त्यात पाणी गोळा करावे.
आपत्काळासाठी पाणी वाचण्याची सवय लावा !
अ. तोंड धुणे, स्नान करणे, लादी पुसणे, कपडे धुणे, वाहन धुणे यांसारखी कामे करतांना आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची सवय मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी लावून घ्यावी.
आ. घराभोवतालच्या बागेसाठी वा शेतीसाठी ठिबक सिंचन अन् तुषार सिंचन या पद्धतींचा वापर करावा.
इ. उन्हाळ्याच्या दिवसांत बागेतील झाडांच्या बुंध्यांभोवती पालापाचोळा किंवा गवत यांचे आच्छादन (मल्चिंग) करावे. यामुळे झाडांना घातलेल्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होणे टळते.